वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होत असून कर्णधार विराट कोहलीसमोर अजिंक्य रहाणे की रोहित शर्मा या मुंबईच्या अनुभवी खेळाडूंना अथवा पाचव्या गोलंदाजाला संधी द्यायची, याबाबतचा पेचप्रसंग उभा राहिला आहे.

जवळपास साडेसात महिन्यांनंतर भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे सहा फलंदाजांसह खेळायचे की एक अतिरिक्त गोलंदाजाला संधी द्यायची, यावर कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना तोडगा काढावा लागणार आहे.

सलामीला लोकेश राहुल, हनुमा विहारी आणि मयांक अगरवाल यांच्यापैकी दोघांना संधी मिळणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या स्थानी विराट कोहली हे भारताच्या फलंदाजीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. सहाव्या क्रमांकावर ऋषभ पंत आणि हार्दिक पंडय़ाच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजाने सातव्या स्थानावर आपली दावेदारी पेश केली आहे. त्यामुळे पाचव्या क्रमांकावर रोहित की रहाणेला संधी द्यायची, याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.

रोहितने अखेरच्या कसोटी सामन्यात नाबाद अर्धशतक तर सराव सामन्यात पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. रहाणेला सराव सामन्यात दुसऱ्या डावात सूर गवसला. अर्धशतकी खेळी करत त्याने अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

संघ व्यवस्थापनाने चार गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला तर जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन किंवा कुलदीप यादव यांना संधी मिळू शकते. मात्र एका अतिरिक्त फलंदाजासह खेळण्याचा निर्णय घेण्यात आला तर जडेजाला डच्चू मिळू शकतो. मात्र खेळपट्टीची पाहणी केल्यानंतरच अंतिम ११ जणांविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे.