किंग्स इलेव्हन पंजाबने अव्वल स्थान निश्चित केल्यानंतर आता शेवटच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुसऱ्या क्रमांकावर मजल मारण्यासाठी चुरस असणार आहे.
प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविण्याची आशा संपुष्टात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला शान राखण्यासाठी शनिवारी चेन्नईविरुद्ध संघर्ष करावा लागणार आहे. तर कोलकाताची गाठ सनरायजर्स हैदराबादशी पडणार आहे. यंदा कोलकाताने सातत्यपूर्ण कामगिरी करीत शानदार विजय मिळविले आहेत. विशेषत: त्यांनी दोन वेळा विजेते असलेल्या चेन्नईसारख्या बलाढय़ संघावर सहज विजय मिळविला आहे. त्यांच्या खेळाडूंनी गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर प्रभाव दाखविला आहे. रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर, युसूफ पठाण, सुनील नरेन, उमेश यादव यांनी चांगले यश मिळविले आहे. खेळाडूंचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी चेन्नई संघ विजयासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांच्या फलंदाजीची मदार प्रामुख्याने द्वायने स्मिथ, डेव्हिड हसी, सुरेश रैना, कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यावर आहे.