कोलकाता नाइट रायडर्सचा संघ सलग चार आणि एकंदर सहा विजयांनिशी आयपीएलच्या सातव्या मोसमात सध्या रुबाबात वावरत आहे. आता ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवणे, हेच ध्येय त्यांच्यासमोर आहे. मंगळवारी कोलकाताचा मुकाबला संभाव्य विजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना एका अस्सल ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्याची अनुभूती मिळणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू झालेली ही स्पर्धा आता भारतात अखेरच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. देशातील वातावरणाचा सर्वाधिक फायदा हा कोलकाता नाइट रायडर्सलाच झाल्याचा प्रत्यय येत आहे. कोलकाताचा हुकमी एक्का जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरिनच्या खात्यावर १५ बळी जमा असून, तो सर्वात किफायतशीर (सरासरी ६.०९) सिद्ध होत आहे.
रॉबिन उथप्पाच्या आक्रमणाची धार सातत्याने जाणवत आहे. मागील सहा सामन्यांत त्याने दोन अर्धशतकांसह ५४.१६ची सरासरी राखली आहे. ११ सामन्यांत त्याने एकंदर ४२२ धावा केल्या आहेत, यापैकी ३२५ धावा भारतातील आहेत. उथप्पाला सलामीला पाठवण्याची योजना कमालीची यशस्वी झाली आहे.
कर्णधार गौतम गंभीरसुद्धा आता संघाच्या विजयात योगदान देऊ लागला आहे. रयान टेन डोइश्चॅट आणि युसूफ पठाण अखेरच्या षटकांमध्ये समर्थपणे जबाबदारी पेलू लागले आहेत. रविवारी रात्री झालेल्या रोमहर्षक लढतीत कोलकाताने सनरायजर्स हैदराबादवर सात विकेट राखून विजय मिळवला. या विजयातून कोलकाताच्या समर्थ फलंदाजीच्या फळीचे दर्शन झाले.
दुसरीकडे ११ सामन्यांत ८ विजय मिळवणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. डेव्हिड हसी रविवारी आपल्या पहिल्या सामन्यात खेळला आणि २५ धावांचे योगदानही दिले. मुंबईकडून यंदा चेन्नईकडे आलेला वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ यशस्वीपणे फलंदाजी करीत आहे. ११ सामन्यांत पाच अर्धशतके झळकावणाऱ्या स्मिथने एकंदर ४४९ धावा काढल्या आहेत, तर ब्रेंडन मॅक् क्युलमच्या खात्यावर तीन अर्धशतकांसह ३५२ धावा जमा आहेत.