भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कृणालने 26 चेंडूंत अर्धशतक ठोकले.

 

आपल्या एकदिवसीय कारकिर्दीच्या पहिल्या डावात कृणाल नाबाद राहिला. त्याने 31 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. या खेळीदरम्यान कृणालने लोकेश राहुलच्या (नाबाद 62) साथीने सहाव्या विकेटसाठी 61 चेंडूंत 112 धावांची भागीदारी केली.

न्यूझीलंडच्या फलंदाजाचा विक्रम मोडला

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटच्या पदार्पणात अर्धशतक ठोकणारा कृणाल 15वा फलंदाज ठरला. कृणालने न्यूझीलंडच्या जॉन मॉरिस यांचा विक्रम मोडला. 1990मध्ये मॉरिस यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना 35 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

डाव संपल्यानंतर कृणाल भावूक

डाव संपल्यानंतर कृणाल भावूक झाला होता. त्याने हार्दिक मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. कृणालने आपली खेळी दिवंगत वडिलांना समर्पित केली.

 

सामना सुरू होण्याआधी कृणाल पांड्याला त्याचा लहान भाऊ हार्दिक पांड्याच्या हातून टीम इंडियाची कॅप देण्यात आली. हार्दिक पांड्याच्या हातून कॅप घेतल्यानंतर कृणाल भावूक झाला होता. त्याने कॅप घेतली आणि वरती आकाशाच्या दिशेने ती कॅप हलवली, जणू काही आपल्या वडिलांना त्याने टीम इंडियाची कॅप दाखवून आदरांजली वाहिली. यावर्षी जानेवारी महिन्यातच कृणालच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.