वैद्यकीय तज्ज्ञांची शिफारस नसताना इंजेक्शन्स घेतल्याचा आरोप ठेवत भारताच्या के. टी. इरफान व व्ही. राकेशबाबू यांची राष्ट्रकुल स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांना त्वरित मायदेशी पाठवण्याचाही आदेश देण्यात आला आहे.

इरफान हा २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सहभागी झाला होता. त्याला १३वे स्थान मिळाले होते. राकेशने तिहेरी उडीतील प्राथमिक फेरीत बारावे स्थान मिळवत अंतिम फेरी निश्चित केली होती. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे (सीजीएफ) अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी भारताच्या दोन्ही खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आले असल्याचे जाहीर केले. भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा समितीला याबाबत सूचना देण्यात आली असल्याचे व या खेळाडूंना लगेचच्या विमानाने मायदेशी पाठवण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी भारतीय बॉक्सिंगपटूंच्या निवासाबाहेर वापरलेली इंजेक्शन्स आढळली होती. त्या वेळी भारतीय पथकातील वैद्यकीय तज्ज्ञांना ताकीद देऊन प्रकरण बंद करण्यात आले होते.

भारतीय खेळाडूंकडून झालेल्या नियमावलीच्या उल्लंघनाबाबत ‘सीजीएफ’ने सिसोदिया, शिरगांवकर व अ‍ॅथलेटिक्स संघाचे व्यवस्थापक रवींदर चौधरी यांनाही ताकीद दिली आहे. कोणतीही इंजेक्शन्स घेण्यापूर्वी स्पर्धेच्या वैद्यकीय समितीस कळविणे अनिवार्य आहे किंवा ही इंजेक्शन्स घेतल्यानंतर २४ तासांत त्याबाबत लेखी पत्र संबंधित समितीकडे देणे अनिवार्य आहे. भारतीय खेळाडूंकडून या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चौकशी समितीची नियुक्ती

इरफान व राकेश यांच्यावरील आरोपांबाबत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सचिव बी.के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली असून राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर ही चौकशी केली जाईल, असे एएफआयचे सचिव सी.के. वॉल्सन यांनी सांगितले. चौकशी समितीमधील अन्य सदस्यांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.

निदरेष असल्याचा खेळाडूंचा दावा

आपल्या खोल्यांमध्ये आढळलेली इंजेक्शन्स आपण वापरलेली नाहीत. आपल्या खोलीत ती कशी आली याची आम्हाला माहिती नाही, असे इरफान व राकेश यांनी सांगितले.

हा निर्णय अयोग्य

राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतलेला हा निर्णय अयोग्य असून आम्हाला तो मान्य नाही. आम्ही त्याच्याविरुद्ध दाद मागणार आहोत.

– नामदेव शिरगांवकर ( भारतीय संघाचे सरव्यवस्थापक )