राष्ट्रकुल स्पध्रेतील रौप्यपदक विजेता एल देवेंद्रो सिंग (४९ किलो) आणि आशियाई स्पध्रेतील कांस्यपदक विजेता विकास कृष्णन (७५ किलो) यांना एआयबीए जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या नऊ सदस्यीय बॉक्सिंग संघात स्थान देण्यात आले आहे. रिओवारी निश्चित करण्याची भारतीय खेळाडूंसाठी ही अखेरची संधी आहे. पात्रता स्पध्रेत सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकणारे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करू शकतील.
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदक पटकावणाऱ्या शिवा थापाने ५६ किलो वजनी गटातून ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे. त्यामुळे पात्रता स्पध्रेत या गटात भारताने बॉक्सिंगपटू उतरवलेला नाही. मुळात ऑलिम्पिक पात्रता मिळवणारा थापा हा एकमेव भारतीय बॉक्सिंगपटू आहे.
ऑलिम्पिक प्रवेशासाठी महिला रिले संघाची धाव!
पीटीआय, नवी दिल्ली
रिओ ऑलिम्पिक स्पध्रेला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना स्पध्रेची पात्रता मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंची धडपड सुरूच आहे. एम. आर. पूवम्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला ४ बाय ४०० मीटर रिले संघ ४ जून रोजी स्लोव्हाकिया येथे होणाऱ्या पीटीएस अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत रिओवारीसाठी धावणार आहेत. ५१.७३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवणाऱ्या पूवम्मासह भारतीय संघात अश्विनी अक्कुंजी, अनिल्दा थॉमस, जुआना मुरमू आणि देबाश्री मजुमदार यांचा समावेश आहे.
या स्पध्रेनंतर ११ व १२ जून या कालावधीत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पध्रेसाठी भारताचा पुरुष व महिला ४ बाद ४०० मीटर रिले संघ टर्की येथे रवाना होणार आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक महासंघाच्या नियमानुसार अव्वल १६ संघच रिओच्या रिले प्रकारात सहभाग घेऊ शकतात. गतवर्षी विश्व रिले स्पध्रेच्या अंतिम फेरीतील संघांना रिओची थेट पात्रता मिळणार असून पहिले आठ संघ निश्चित झाले आहेत. ९ ते १६ स्थानासाठी १ जानेवारी २०१५ ते ११ जुलै २०१६ या कालावधीत जलद वेळ नोंदवणाऱ्या संघ पात्र ठरणार आहेत.