हार्दिक पांड्याने मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात केली. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. १९५ धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांत श्रेयस अय्यरच्या साथीने मैदानात तुफान फटकेबाजी करत सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी २५ धावांची गरज होती. परंतू हार्दिकच्या फटकेबाजीमुळे या आव्हानाचं फारसं दडपण भारतावर आलं नाही.

दुसरा सामना जिंकल्यानंतर हार्दिकचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. “हार्दिकने याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारची खेळी केली आहे. जो खेळाडू आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात असतो आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर तुमचा आत्मविश्वास आणखी दुणावतो. त्याने याआधीही असं करुन दाखवलंय, त्यामुळे दुसऱ्या सामन्यातली त्याची खेळी माझ्यासाठी फारशी नवी नाही. असे फार कमी खेळाडू आहेत की जे मैदानावर असले तर कोणत्याही टार्गेटचा यशस्वी पाठलाग होऊ शकतो. पूर्वी धोनी-युवराज होते…आता मॅक्सवेल-पांड्या यासारख्या खेळाडूंमध्ये ती ताकद आहे.” ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत गंभीर बोलत होता.

या मालिकेतला अखेरचा टी-२० सामना मंगळवारी खेळवला जाणार आहे. मालिका खिशात घातल्यामुळे भारतीय संघाला अखेरच्या सामन्यात प्रयोग करण्याची चांगली संधी आहे.

अवश्य वाचा – सूर्यकुमारला भारत सोडावा लागणार नाही, BCCI त्याच्या पाठीशी ! पाक खेळाडूने PCB ला फटकारलं