भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रांची येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसरा दिवस चेतेश्वर पुजाराचा राहिला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध काल काहीसा झगडणारा पुजारा आज मात्र खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहिला. पुजाराने त्याच्या कारकीर्दीतील ११ वे शतक झळकावले असून दिवसअखेर १३० धावांवर नाबाद आहे. तत्पूर्वी कालच्या १ बाद १२० या धावसंख्येवरून चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी ७३ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना उपहारापर्यंत कोणतेही यश मिळून दिले नव्हते. मात्र, उपहाराला अवघे काही चेंडू शिल्लक असताना मुरली विजयला ओकिफच्या चेंडूने चकवले आणि तो यष्टीचीत झाला. त्याने १८३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेला विराट कोहली फार काळ खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. पॅट कमिन्सने त्याला ६ धावांवर स्मिथकरवी झेलबाद करवले. त्यानंतर कमिन्सने रहाणे आणि अश्विनला माघारी धाडले. आर.आश्विन विकेटकीपरकडे कॅच देत तंबूत परतला आहे. आॅस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने त्याला एका शाॅर्ट बाॅलवर बाद केलं. यावेळी आश्विन आऊट नाही असं अंपायरचं म्हणणं होतं पण आॅस्ट्रेलियाने रिव्ह्यूचा वापर केल्यानंतर त्यात बाॅल आश्विनच्या ग्लोव्हला घासून गेल्याचं दिसल्याने त्याला आऊट घोषित करण्यात आलं. याआधी चेतेश्वर पुजाराला चांगली साथ देणाऱ्या करूण नायरचा २३ रन्सवर त्रिफळा उडाला. हेझलवूडने त्याला आऊट केलं.  त्यानंतर मैदानात आलेल्या वृद्धिमान साहाने भारतीय संघाची पडझड रोखली असून तो दिवसअखेर १८ धावांवर नाबाद आहे.

काल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावांवर मजल मारली. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने दिवसाअखेरीस १ बाद १२० अशी समाधानकारक सुरूवात केली होती. भारताकडून केएल राहुल याने पुन्हा एकदा अर्धशतकी कामगिरी केली. तर दुसऱया बाजूला मुरली विजय धावांसाठी खूप झगडताना दिसला. केएल राहुल ऐन फॉर्मात असताना तो ६७ धावांवर झेलबाद होऊन तंबूत दाखल झाला. त्यानंतर पुजाराने मुरली विजयला संयमी साथ दिली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नाबाद १७८ धावा आणि ग्लेन मॅक्सवेलने दिलेली शतकी साथ यामुळे ८८ धावांवर ३ बाद अशी बिकट स्थिती असलेल्या कांगारुंना साडेचारशे धावांपर्यंत पोहोचता आले. दुसऱया दिवसाच्या पहिल्या सत्रात स्मिथ आणि मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेणं सुरू ठेवत चांगली फटकेबाजी केली. मॅक्सवेलने आपले कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक देखील पूर्ण केले. मग जडेजाने मॅक्सवेलला पुढच्याच षटकात झेलबाद करून ही जोडी फोडली. मॅक्सवेल-स्मिथने पाचव्या विकेटसाठी तब्बल १९१ धावांची भागीदारी रचली.

मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडनेही फटकेबाजी करून अर्धशतकी भागीदारी केली. वेडचा काटा देखील जडेजाने काढला. पण दुसऱया बाजूने स्मिथने फलंदाजी सुरू ठेवून संघाच्या धावसंख्येला आकार देणे सुरू ठेवले होते. पण त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. जडेजाने कमिन्सला खातेही उघडू दिले नाही. पुढे ठराविक अंतरानंतर भारतीय गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५१ धावांमध्ये संपुष्टात आला. स्मिथ १७८ धावांवर नाबाद राहिला.