भारतीय संघाच्या ५५७ धावांचा पाठलाग करणाऱय़ा न्यूझीलंडच्या संघाचा पहिला डाव केवळ २९९ धावांत संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात २५८ धावांनी भक्कम आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात चांगली झाली होती. किवींची सलामीवीर जोडी गप्तिल आणि लॅथम यांनी शतकी भागीदारी रचून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. कसोटीच्या तिसऱया दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत होता. गप्तील आणि लॅथम यांनी आपले अर्धशतक देखील पूर्ण केले होते. मात्र, उपहारानंतरच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले. फिरकीपटू आर.अश्विनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हात टेकले. गप्तिल आणि लॅथम जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडच्या धावसंख्येला जणू उतरती कळाच लागली. अश्विनने रॉस टेलर आणि ल्यूक राँची यांना शून्यावर माघारी धाडले. तर विल्यमसनने केवळ ८ धावा केल्या. त्यानंतर जेम्स निशम याने मैदानात चांगली फटकेबाजी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रय़त्न केला खरा पण त्याला दुसऱया बाजून अपेक्षित साथ मिळू शकली नाही. निशमने ७१ धावा केल्या. अश्विनने न्यूझीलंडच्या ६ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून सध्या मार्टिन गप्तिल याने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर लॅथमने अर्धशतक ठोकले.

भारतीय संघाच्या दुसरया डावाला चांगली सुरूवात झाली होती. पण ट्रेंट बोल्टचा चेंडू गौतम गंभीरच्या उजव्या खांद्यावर आदळला. दुखापतीमुळे गंभीरला तंबूत परतावे लागले आहे. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या बिनबाद १८ अशी असून भारतीय संघाने २७६ धावांची आघाडी घेतली आहे. मुरली विजय ११ तर पुजारा १ धाव करून नाबाद आहे.

तत्पूर्वी भारताने काल पहिला डाव ५ बाद ५५७ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे आज न्यूझीलंडचा संघ या धावसंख्येला कसे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही कधी उसळी घेणारे तर कधी खाली बसणारे चेंडू पडत असतानाही अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने दर्जेदार फलंदाजीचा नमुना पेश केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी रचलेली ३६५ धावांचीभागीदारी  ही भारताची सर्वोत्तम भागीदारी आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे २००४ साली चौथ्या विकेटसाठी ३५३ धावा केल्या होत्या. कर्णधार कोहलीच्या द्विशतकानंतर अजिंक्य रहाणेही द्विशतक ठोकतो का याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण अजिंक्य रहाणेचे १२ धावांनी द्विशतक हुकले. रहाणेने १८८ धावांची खेळी केली असून यामध्ये १८ षटकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.

पहिल्या दिवशी भारतीय संघ अडचणीत असताना कोहली आणि रहाणेने जबाबदारीने फलंदाजी करत भारताला संकटातून बाहेर काढले. पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतीय संघ ३ बाद १०० असा अडचणीत सापडला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणे कोहलीला साथ देण्यासाठी मैदानात उतरला. पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र, दुसऱ्या दिवसाचे पहिले आणि दुसरे सत्र खेळून काढत रहाणे आणि कोहलीने न्यूझीलंडला यश मिळू दिले नाही. बचाव आणि आक्रमणाचा सुरेख मेळ साधत या दोन्ही फलंदाजांनी भारतीय संघाला सुस्थितीत नेेले होते.

India vs New Zealand: दिवसभरातील अपडेट्स

Live Updates
16:36 (IST) 10 Oct 2016
तिसऱया दिवसाअखेरीस भारत बिनबाद १८ धावा, भारतीय संघाकडे २७६ धावांची आघाडी
16:27 (IST) 10 Oct 2016
ट्रेंट बोल्टचा चेंडू गंभीरच्या उजव्या खांद्यावर आदळला, गंभीर दुखापतग्रस्त होऊन तंबूत दाखल
16:26 (IST) 10 Oct 2016
भारतीय संघाच्या दुसऱया डावाला सुरूवात, गंभीर आणि मुरली विजयची संयमी सुरूवात
15:56 (IST) 10 Oct 2016
अश्विनने मिळवल्या सहा विकेट्स, अश्विनच्या फिरकीपुढे किवींनी हात टेकले
15:55 (IST) 10 Oct 2016
न्यूझीलंडचा पहिला डाव २९९ धावांत संपुष्टात, भारतीय संघाकडे २५८ धावांची भक्कम आघाडी
15:52 (IST) 10 Oct 2016
भक्कम सुरूवातीनंतर न्यूझीलंडचा डाव गडगडला, किवींची शेवटची विकेट शिल्लक आणि धावसंख्या केवळ २९९
15:49 (IST) 10 Oct 2016
न्यूझीलंड ९ बाद २९९
15:49 (IST) 10 Oct 2016
अश्विनकडून न्यूझीलंडला आणखी एक धक्का, जीतन पटेल बाद
15:48 (IST) 10 Oct 2016
हेन्रीचा उत्तुंग षटकार, न्यूझीलंड ८ बाद २८६
15:47 (IST) 10 Oct 2016
अश्विनने निशमला धाडले माघारी, न्यूझीलंड ८ बाद २८०
15:42 (IST) 10 Oct 2016
भारतीय संघाला मोठे यश, जेम्स निशम ७१ धावांवर बाद
15:34 (IST) 10 Oct 2016
८६षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ७ बाद २७०
15:33 (IST) 10 Oct 2016
जडेजाने घेतली सँटनरची विकेट, सँटनर २२ धावांवर बाद
15:32 (IST) 10 Oct 2016
न्यूझीलंडची सातवी विकेट, मिचेल सँटनर बाद
14:54 (IST) 10 Oct 2016
निशमचे अर्धशतक, न्यूझीलंड ६ बाद २३९
14:53 (IST) 10 Oct 2016
७५ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २२८/६
14:52 (IST) 10 Oct 2016
जेम्स निशमकडून चांगली फलंदाजी, निशम अर्धशतकाजवळ
14:45 (IST) 10 Oct 2016
न्यूझीलंडच्या धावसंख्येने २०० चा टप्पा गाठला, ६८ व्या षटकानंतर न्यूझीलंड ६ बाद २११
13:08 (IST) 10 Oct 2016
५१ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १५१/५ , भारतीय संघ अजूनही ४०५ धावांनी आघाडीवर
13:00 (IST) 10 Oct 2016
अश्विनने ल्युक राँचीला शून्यावर धाडले माघारी, रहाणेने टीपला झेल
12:58 (IST) 10 Oct 2016
अश्विनच्या फिरकीपुढे किवी निष्प्रभ, न्यूझीलंडला पाचवा धक्का
12:56 (IST) 10 Oct 2016
मार्टिन गप्तिल ६४ धावांवर बाद
12:54 (IST) 10 Oct 2016
उपहारानंतरच्या खेळात भारतीय संघाचे पुनरागमन, न्यूझीलंड ४ बाद १४८
12:54 (IST) 10 Oct 2016
न्यूझीलंडला आणखी एक धक्का, अश्विनने घेतली मार्टिन गप्तिलची विकेट
12:43 (IST) 10 Oct 2016
अश्विनचा तिसरा बळी; रॉस टेलर भोपळा न फोडताही माघारी
12:42 (IST) 10 Oct 2016
भारताला दुसरे यश; विल्यमसन ८ धावांवर बाद
12:09 (IST) 10 Oct 2016
भारताला पहिले यश; लॅथम ५३ धावांवर बाद
11:09 (IST) 10 Oct 2016
किवींच्या सलामी जोडीने मैदानात चांगलाच जम बसविल्याचे दिसून येते आहे. भारतीय संघाला गप्तिल-लॅथम जोडी त्वरित फोडण्याची गरज
11:08 (IST) 10 Oct 2016
गप्तिलपाठोपाठ टॉम लॅथमनेही गाठले अर्धशतक, लॅथमने चौकार ठोकून साजरे केले अर्धशतक
11:07 (IST) 10 Oct 2016
जडेजाच्या चेंडूवर लॅथमचा शानदार चौकार, न्यूझीलंड बिनबाद ११६ धावा
11:04 (IST) 10 Oct 2016
न्यूझीलंडच्या धावसंख्येचे शतक, ३१ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड बिनबाद १११ धावा.
11:03 (IST) 10 Oct 2016
मार्टिन गप्तिलचे अर्धशतक पूर्ण, तर लॅथम देखील अर्धशतकच्या जवळ
11:02 (IST) 10 Oct 2016
मार्टिन गप्तील आणि लॅथम यांच्याकडून जोरदार फटकेबाजी
10:40 (IST) 10 Oct 2016
२४ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड बिनबाद ६८ धावा
10:40 (IST) 10 Oct 2016
सध्या किवींच्या धावसंख्येने अर्धशतक गाठले असून, मार्टिन गप्तीलने ४० धावांच्या टप्पा ओलांडला आहे
10:39 (IST) 10 Oct 2016
मार्टिन गप्तील आणि लॅथम संयमी फलंदाजी करून संघाच्या धावसंख्येला आकार देत आहेत.
10:38 (IST) 10 Oct 2016
सामन्याच्या तिसऱया दिवशी न्यूझीलंडच्या सलामी जोडीकडून सावध सुरूवात होताना दिसत आहे