आठवडय़ाची मुलाखत : ऋषिकेश बामणे

मुंबई : करोना साथीच्या पार्श्वभूमी वर देशभरात गेल्या दीड वर्षांपासून टाळेबंदीसारखीच परिस्थिती कायम असून या काळात स्वत:च्या खेळाचे आत्मपरीक्षण केल्यामुळे ऑलिम्पिकच्या दृष्टीने उत्तम तयारी करता आली, अशी प्रतिक्रिया भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू ज्ञानशेखरन साथियानने व्यक्त केली. याशिवाय कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्याचे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे, असेही साथियानने सांगितले.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला २३ जुलैपासून प्रारंभ होणार असून २८ वर्षीय साथियान पुरुष एकेरीत भारताकडून पदकासाठी दावेदारी पेश करणार आहे. साथियानला टाळेबंदीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्याने हार न मानता दोहा येथे मार्च महिन्यात झालेल्या पात्रता स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले. त्या पाश्र्वभूमीवर अर्जुन पुरस्कार विजेत्या बेसलाइन व्हेंचर्सच्या साथियानशी केलेली खास बातचीत-

  • ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न साकार झाल्यानंतर तुझ्या भावना काय होत्या?

कोणत्याही क्रीडापटूचे ऑलिम्पिकसारख्या नामांकित स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. वयाच्या ११व्या वर्षी २००४मध्ये ज्यावेळी मी प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धा पाहिली, तेव्हाच एके दिवशी भारताकडून या स्पर्धेत खेळायचे, असा निश्चय मनाशी पक्का केला. अखेर अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझे पालक, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. मात्र माझी खरी कसोटी आता सुरू झाली असून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणे, हेच माझे एकमेव ध्येय आहे.

  •  टाळेबंदीच्या काळात तू स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीकडे कसे लक्ष केंद्रित केले?

मागील दीड वर्ष सर्वासाठीच आव्हानात्मक ठरले. असंख्य क्रीडापटूंच्या मानसिक आरोग्यावर यादरम्यान परिणाम झाला. करोनाविरुद्धच्या लढय़ात मी माझे प्रशिक्षक तसेच काही नातलगांनाही गमावले. मात्र या सर्व घटनांचा माझ्या खेळावर किंवा तंदुरुस्तीवर प्रभाव जाणवणार नाही, याची काळजी घेतली. नैराश्य, ताणतणावाला सामोरे जावे लागू नये, यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याबरोबरच अनेक माजी टेबल टेनिसपटू तसेच मानसशास्त्रज्ञांशी संवाद साधत राहिलो. भारतीय टेबल टेनिस संघाच्या तंदुरुस्ती प्रशिक्षकांनी माझ्यासह सर्वच खेळाडूंना या काळात मार्गदर्शन केले. टाळेबंदीच्या सुरुवातीपासून व्यायामशाळा बहुतांशी बंद असल्याने मी घरीच व्यायामाची साधने उपलब्ध करून स्वत:ची शारीरिक तंदुरुस्ती जपली. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी स्वत:ला अधिक उत्तमरीत्या तयार करण्याकरता टाळेबंदीचा काळ माझ्यासाठी लाभदायक ठरला.

  •   यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय टेबल टेनिसपटूंकडून सर्वाना फार अपेक्षा आहेत. याकडे तू कशा रितीने पाहात आहेस?

गेल्या काही वर्षांत राष्ट्रकुल, आशियाई आणि विश्वचषक स्पर्धामध्ये भारतीय टेबल टेनिसपटूंनी अभिमानास्पद कामगिरी केल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत. मात्र चाहत्यांच्या अपेक्षांचे आमच्यावर किंचितही दडपण नाही. किंबहुना आमच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे त्यांना अधिक आनंदी क्षण अनुभवता येतील असे मला वाटते. माझ्यासह सर्वच खेळाडू सध्या फक्त प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहेत. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय टेबल टेनिसपटूंमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल ४० खेळाडूंत स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे सर्वानी लौकिकानुसार खेळ केला, तर भारताला टेबल टेनिसमध्ये किमान दोन पदके नक्कीच मिळू शकतील.

  •   टेबल टेनिसच्या पायाभूत सुविधांविषयी तुला काय वाटते?

भारतीय टेबल टेनिसपटूंची सध्याची फळी सर्वोत्तम आहे. यामध्ये माझ्याव्यतिरिक्त शरथ कमल, मनिका बत्रा, मधुरिका पाटकर यांसारख्या अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंचेही तितकेच योगदान आहे. मानव ठक्कर, दिया चितळे, अर्चना कामत यांच्यामुळे देशातील टेबल टेनिसचे भविष्य सुरक्षित आहे, याची खात्री पटते. अल्टिमेट लीग, खेलो इंडिया या स्पर्धाचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. अल्टिमेट लीगमुळे त्यांना कारकीर्दीच्या सुरुवातीलाच विदेशी खेळाडूूंच्या सोबतीने खेळण्याची तसेच त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळत आहे. मात्र प्रशिक्षणाच्या पातळीत नक्कीच सुधारणेला वाव आहे. शालेय स्तरावर आता टेबल टेनिसच्या स्पर्धाचे नियमित आयोजन होत असले तरी, बऱ्याचदा प्रशिक्षकांनाच खेळाच्या तांत्रिक बाबींविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे खेळाडूंचे नुकसान होते. शालेय वयोगटापासूनच खेळाडूच्या तंत्रावर अधिक मेहनत घेतल्यास पुढे त्यांना विदेशी खेळाडूंना तोडीसतोड झुंज देणे सोपे होईल, असे मला वाटते.

ज्ञानशेखरन साथियान, भारताचा टेबल टेनिसपटू