आठवडय़ाची मुलाखत : प्रदीप गंधे, भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष

भारताच्या बॅडमिंटनचा भारताच्या बॅडमिंटनचा स्तर सध्या चांगलाच उंचावला आहे. एकेरीमध्ये चार ते पाच जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. २०१७ सालातील अनेक स्पर्धामधील भारतीय खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे, मात्र वाढलेल्या स्पर्धाचा त्यांच्या तंदुरुस्तीवरही परिणाम होत असल्याचे जाणवत आहेत; पण स्पर्धात्मक युगात तग धरायचा असल्यास खेळाडूंनी व्यग्र वेळापत्रकाचा बाऊ करता कामा नये, असे स्पष्ट मत माजी बॅडमिंटनपटू आणि भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या खेळाडूंची होत असलेली पीछेहाट, पायाभूत सुविधांचा अभाव आणि सरकारची अनास्था याकडे लक्ष वेधले.

  • राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अव्वल खेळाडूंना तयार करावे लागले?

संपूर्ण वर्षभरात अव्वल खेळाडू अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळतात. मात्र राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यास टाळाटाळ करतात. नागपूरमध्ये झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी अव्वल बॅडमिंटनपटूंना तयार करावे लागले. पूर्वी राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्याशिवाय आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक स्पर्धेसाठी निवड व्हायची नाही. आता किमान तसा आग्रह नसतो. जागतिक बॅडमिंटन महासंघाचा व्यग्र कार्यक्रम हा ८ ते १० खेळाडूंसाठी असतो. अन्य खेळाडूंचे काय? अव्वल खेळाडूंना ३६५ दिवसांतून एखादी राष्ट्रीय स्पर्धा खेळायला कंटाळा येतो, हे पटत नाही. आमच्या वेळच्या तुलनेत सध्याच्या खेळाडूंना खूप पैसे मिळतात. प्रसिद्धी मिळते आहे. याचा आनंद आहे. मात्र खेळाडूंनी सामाजिक बांधिलकी जपण्याचीही गरज आहे.

  • दुहेरीतील खेळाडूंना सापत्न वागणूक मिळते का?

दुहेरीतील खेळाडूंची व्यथा चुकीची आहे. आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे, ही दुहेरीतील बॅडमिंटनपटूंची व्यथा चुकीची आणि समजण्यापलीकडील आहे. अद्ययावत प्रशिक्षण मिळत नसेल तर दुहेरीतील खेळाडूंची समस्या समजून घेता येईल. मात्र एकेरीच्या खेळाडूंप्रमाणे वागणूक मिळत नाही, हा आरोप चुकीचा वाटतो. तसा शिरस्ता जगभर आहे. टेनिस ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंची नावे सहज सांगता येतील. मात्र दुहेरी आणि मिश्र प्रकारातील विजेत्यांची नावे झटपट कोण सांगेल?

  • बॅडमिंटनमध्ये सध्या महाराष्ट्र पिछाडीवर का आहे?

हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमी आणि बेंगळूरू, कर्नाटकमधील प्रकाश पदुकोण अकादमीमुळे देशाला अनेक चांगले बॅडमिंटनपटू मिळाले आहेत. कोचिनमध्ये इनडोअर स्टेडियम आहे. अलाहाबाद आणि लखनौमध्ये सुसज्ज बॅडमिंटन कोर्ट आहेत. राजधानी दिल्लीमध्ये सर्वच प्रकारच्या मुबलक सुविधा आहेत. त्याचा फायदा येथील खेळाडूंना होतो. परिणामी, तिथे अनेक जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटू तयार होत आहेत. मात्र महाराष्ट्रात चांगल्या पायाभूत सुविधा नाहीत. कुठलीही अकादमी नाही. मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संकुल त्यातील विद्यार्थ्यांसाठी आहेत. एनएससीआय, सीसीआय तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची कोर्ट त्यांच्या सदस्यांपुरती मर्यादित आहेत. परिणामी, महाराष्ट्राचे खेळाडू कनिष्ठ स्तरावर चमकतात. पुढे अपुऱ्या सोयीसुविधांमुळे त्यांना अद्ययावत प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन तसेच स्पर्धा नसल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यात त्यांना अडचणी येतात.

  • असोसिएशनच्या मागण्यांना सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात का?

दक्षिणेकडील राज्यांसह हरयाणा आदी राज्यांमध्ये क्रीडा संस्कृतीला पोषक राजकारणी आहेत. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात खेळ आणि खेळाडूंना समजून घेणारे राजकारणी नाहीत. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनतर्फे बॅडमिंटन स्टेडियम तसेच बॅडमिंटन कोर्टसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले; पण सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे अकादमी उभारण्याची २५ वर्षांपूर्वीची मागणी प्रलंबित आहे. सरकारे बदलत गेली आणि आमची मागणी मागे पडली.

  • क्रीडा संकुलाच्या उभारणीचा पेच सुटला का?

मुंबई विद्यापीठाच्या कलिना क्रीडा संकुलात प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनतर्फे प्रस्ताव ठेवण्यात आला. आधीच्या उपकुलगुरूंनी त्यासाठी अनुकूलता दर्शवली. मात्र नव्या उपकुलगुरूंनी नकार दिला. यापूर्वीचा अनुभव वाईट होता, असे ते म्हणाले. मागील अनुभवांतून शिकायचे असते, असे मी म्हणालो. त्यावर ते म्हणाले की, आमच्या ७ लाख विद्यार्थ्यांच्या खेळाची सोय करता येईल, असे काही तरी करा. त्यांची अनपेक्षित मागणी पाहून आम्ही प्रस्ताव मागे घेतला. सिडको प्रशासनामध्येही तसाच अनुभव आला. पैसे असतील तर बोला. रिकाम्या हाताने कसे आलात, असे मुख्य प्रशासकांनी आम्हाला सुनावले. जणू काय आम्हाला स्वत:साठी स्टेडियम बांधायचे आहे?

  • जिल्हा तिथे स्टेडियम ही योजनाही बारगळली?  

क्रीडा विकासाला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने जिल्हा तिथे स्टेडियम या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली. मात्र योजना अंमलबजावणीसाठी पुरेशी उपाययोजना केली गेली नाही. महाराष्ट्रातल्या मुली बेंगळूरुतील प्रकाश पदुकोन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेऊन देशात अव्वल ठरल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात येऊन सराव आणि प्रशिक्षण घ्यायचे म्हटल्यास आपल्याकडे तशा सुविधा आहेत का? महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योगपती आहेत किंवा सरकार स्वत: अकादमी उभी करू शकते. मात्र सरकारची तशी मानसिकता नाही. त्यामुळे प्रतिभावंत मुलांना चांगल्या शिक्षणासह खेळांमध्ये प्रगती करता येत नाही.