भारतातील नानाविध खाद्यपदार्थ एकाचवेळी एकत्र पाहायला मिळाले तर ती आरास ज्या पद्धतीने फुलून दिसेल तसाच माहोल ‘भारत-श्री’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये पाहायला मिळाला. महाराष्ट्राचे एकूण २४ पैकी २१ शरीरसौष्ठवपटू मुख्य स्पर्धेत सहभागी होणार असल्याने यजमानांकडून यावेळी मोठय़ा अपेक्षा असतील. पण महाराष्ट्राला यावेळी कडवी झुंज मिळेल ती रेल्वे आणि नौदलाच्या शरीरसौष्ठवपटूंची. आपल्या पिळदार शरीरसंपदेच्या जोरावर कोण भारताचा ‘दबंग’ ठरतो, याकडेच आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी ‘भारत-श्री’ स्पर्धेमध्ये ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ ठरलेला भारतीय रेल्वेचा मुरली कुमार यावर्षीही जेतेपद कायम ठेवण्याच्या इर्षेने मैदानात उतरणार आहे. महाराष्ट्र गाजवणाऱ्या सुनीत जाधवकडून सर्वाना मोठय़ा अपेक्षा असतील, पण त्याला गटामध्ये महाराष्ट्राच्या बी. महेश्वरनकडून कडवी झुंज मिळू शकते.
८५ किलो वजनी गटामध्येही महाराष्ट्राचा सागर माळी आणि जगदीश लाड यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळेल. तर ६० किलो वजनी गटात स्वप्नील नरवडकरकडून मोठय़ा अपेक्षा असतील. आतापर्यंत चार वेळा ‘भारत-श्री’ स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सागर कातुर्डेची जादू चालेल का, याकडेही साऱ्यांचे लक्ष असेल.

मुख्य फेरीत पोहोचलेले महाराष्ट्राचे शरीरसौष्ठवपटू
५५ किलो : हर्षद काटे, सुनील सकपाळ.
६० किलो : गजानन पालव, स्वप्नील नरवडकर, नितीन म्हात्रे.
६५ किलो : फैयाझ शेख.
७० किलो : सचिन खांबे, प्रमोद सिंग.
७५ किलो : सागर कातुर्डे, सचिन पाटील.
८० किलो : भास्कर कांबळी, प्रवीण कदम, सुनीत जाधव, बी. महेश्वरन.
८५ किलो : सकिंदर सिंग, जगदीश लाड, सागर माळी.
९० किलो : रेणसू चंद्रन.
९० किलो आणि वरील : गणेश उरणकर, महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर