अर्धशतकी खेळीने संघाची सरशी; हैदराबादचा सात गडी राखून पराभव
दिल्ली : ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ई-गटात तिसऱ्या विजयाची नोंद केली.
हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १२४ धावांचे आव्हान उभे केले. यात रोहित रायुडूने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याने ३४ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी साकारली. बव्हानाका संदीप (२५) सोबत त्याने चौथ्या गडय़ासाठी ४७ धावांची भागीदारी केली. महाराष्ट्राच्या विशाल गीतेने ३० धावांत दोन बळी घेतले.
त्यानंतर, सलामीवीर विजय झोल आठ धावांवर तंबूत परल्यामुळे महाराष्ट्राची १ बाद १८ अशी अवस्था झाली. मग ऋतुराजने दुसऱ्या गडय़ासाठी कर्णधार राहुल त्रिपाठीसोबत ४२ धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराजने त्रिपाठीचा (१६) त्रिफळा उडवल्यानंतर ऋतुराजने नौशाद शेख (नाबाद ४२) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची उपयुक्त भागीदारी रचली. ऋतुराजने ४० चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ५४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
हैदराबाद : २० षटकांत ६ बाद १२४ (रोहित रायुडू ४७; विशाल गीते २/३०) पराभूत वि. महाराष्ट्र : १८ षटकांत ३ बाद १२५ (ऋतुराज गायकवाड ५४, नौशाद शेख नाबाद ४२; पलकोडेटी सायराम २/३८.)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 3:18 am