महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे शनिवार व रविवारी लोणावळा येथे ‘महाराष्ट्र श्री’ व ‘मिस महाराष्ट्रर्’ शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्य़ांमधील २५० हून जास्त खेळाडू भाग घेत आहेत.
आगामी ‘भारत श्री’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील खेळाडूंची निवड या वेळी केली जाणार असल्यामुळे या स्पर्धेस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ किलोखालील व ८५ किलोवरील या गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकांच्या खेळाडूंना २० हजार, १३ हजार, ८ हजार, ६ हजार व ३ हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. ‘महाराष्ट्र श्री ’ किताब मिळविणाऱ्या खेळाडूस ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. महिलांच्या गटात ‘मिस महाराष्ट्र’ किताब मिळविणाऱ्या खेळाडूला १० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. दोन ते पाच क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. महिलांकरिता खुला वजनी गट राहणार आहे.
स्पर्धेतील प्राथमिक फेऱ्यांचे आयोजन कुमार रिसॉर्ट (लोणावळा) येथे होईल तर मुख्य फेरी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (लोणावळा) येथे होईल.