भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, कुस्तीपटू विनेश फोगट आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांची क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

राणीची हॉकी इंडियाकडून प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय हॉकीमध्ये वंदना कतारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंग यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राणीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७मध्ये आशिया चषक पटकावला होता. तिने २०१९मध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निर्णायक गोल केल्याने भारताला टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला पात्र ठरता आले.

भारतीय कुस्ती महासंघाकडून विनेशची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विनेश पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारताकडून एकमेव महिला कुस्तीपटू आहे.

२०१६ रियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिकची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याआधी साक्षीला २०१६मध्ये खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र तिने यंदा अर्जुन पुरस्कार मिळण्यासाठी अर्ज केला होता. कुस्ती महासंघाकडून महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी निश्चित झाले आहे. आवारेने नूर सुलतान येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या दीपक पूनियासह संदीप तोमर आणि नवीन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारताची अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बात्राची खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय टेबल टेनिस महासंघाकडून सलग दुसऱ्या वर्षी शिफारस करण्यात आली आहे. २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत सुवर्णपदक पटकवणारी ती भारताची पहिली महिला टेबल टेनिसपटू होती. गेल्या वर्षी तिला खेलरत्न पुरस्कार घोषित झाला नव्हता. मधुरिका पाटकर, मानव ठक्कर आणि सुतीर्थ मुखर्जी यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.