न्यूझीलंडच्या आखूड टप्प्यांच्या चेंडूंची रणनीती आव्हानात्मक

ख्राइस्टचर्च : बेसिन रिझव्‍‌र्हच्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताचा दिमाखदार फलंदाजी आणि जागतिक दर्जाच्या गोलंदाजीचा रुबाब गळून पडला. न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजीचे तंत्र उघडे पडले. आता शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या आखूड टप्प्यांच्या चेंडूंच्या रणनीतीविरुद्ध भारतीय फलंदाजांची पुन्हा कसोटी ठरणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच फलंदाजांना हाराकिरी पत्करल्यामुळे भारताचा कसोटी सामना फक्त साडेतीन दिवसांत संपला. दुसरी कसोटी होत असलेल्या हॅगले ओव्हरची खेळपट्टी ही तर बेसिन रिझव्‍‌र्हपेक्षाही अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्यातच नील वॅगनरच्या समावेशामुळे न्यूझीलंडची वेगवान गोलंदाजांची फळी अधिक सक्षम झाली आहे.

खडाडून जाग येण्यासाठी धक्क्याची आवश्यकता – शास्त्री

पहिल्याच कसोटीतील धक्कादायक पराभवामुळे खडाडून जाग आली आहे. पराभवाची चव न चाखता फक्त विजयी घोडदौड राखल्यास मनावर झापड येते. त्यामुळेच या धक्क्याची आवश्यकता होती, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले.

‘‘सदैव विजयपथावर असताना मानसिकदृष्टय़ा चौकटी आखल्या जातात. याच चौकटी भेदण्याचे कार्य पहिल्या कसोटीतील पराभवामुळे साधले गेले. न्यूझीलंडच्या रणनीतीमधून आम्ही धडा घेतला आहे आणि दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झालो आहोत,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

संघ

* भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, रवींद्र जडेजा, जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी, शुभमन गिल, उमेश यादव, नवदीप सैनी, वृद्धिमान साहा.

* न्यूझीलंड (अंतिम १२) : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, रॉस टेलर, कॉलीन डी ग्रँडहोम, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), कायले जॅमिसन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, नील व्ॉगनर, अजाझ पटेल.

* सामन्याची वेळ : पहाटे ४ वाजल्यापासून.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.

पृथ्वी शॉ खेळणार

सलामीवीर पृथ्वी शॉ खेळणार असल्याचे प्रशिक्षक शास्त्री यांनी स्पष्ट केले. २० वर्षीय पृथ्वीने शुक्रवारी नेटमध्ये प्रशिक्षक आणि कर्णधार कोहली यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला.

इशांत दुखापतीमुळे संघाबाहेर

अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. गेल्या महिन्यात रणजी करंडक क्रिकेट सामन्यात इशांतच्या उजव्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. इशांतला पुढील सहा आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे इशांतच्या जागी उमेश यादव किंवा नवदीप सैनीला संधी मिळू शकेल.