निवड समितीच्या अध्यक्षा संगीता कामत यांचे आश्वासन

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष होत असून ‘लोकसत्ता’च्या बातमीनंतर ‘एमसीए’ला अखेर जाग आली आहे. यापुढे मुलींच्या आंतरशालेय स्पर्धेकरिता रोख पारितोषिके देऊन नीटनेटक्या आयोजनाकडे विशेष लक्ष पुरवण्यात येईल, असे आश्वासन ‘एमसीए’च्या महिलांच्या निवड समितीच्या अध्यक्षा संगीता कामत यांनी दिली. वैयक्तिक पुरस्कार न देताच खेळाडूंची बोळवण करणाऱ्या घटनेबद्दल मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

इस्लाम जिमखाना येथे ५ ते ७ आणि ११ फेब्रुवारीदरम्यान मुंबई शालेय क्रीडा संघटना (एमएसएसए) व ‘एमसीए’च्या संयुक्त विद्यमाने १६ वर्षांखालील मुलींची मनोरमाबाई आपटे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा रंगली. या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना व अंतिम सामना यांच्यात अवघ्या दोन तासांचा अवधी होता. त्याशिवाय विजेतेपदाच्या चषकासह एकही पुरस्कार देण्यात आला नाही, त्यामुळे खेळाडू व प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भातील बातमी ‘लोकसत्ता’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर एमसीएनेही याची दखल घेत यापुढे आयोजनात योग्य तो बदल करण्याचे ठरवले आहे.

‘‘यंदाच्या स्पर्धेचे वैयक्तिक पुरस्कार देण्यात येतील की नाही, याविषयी मी काहीही बोलू इच्छित नाही. मात्र महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आंतरशालेय स्तरावर पैशांची कमतरता जाणवत आहे. प्रायोजक नसल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्याशिवाय उपांत्य व अंतिम फेरीत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला यापुढे किमान २० ते २५ हजार रुपयांपर्यंत पारितोषिक देण्याबरोबरच वैयक्तिक पुरस्कारही देण्यात यावे यासाठी मी स्वत: ‘एमसीए’च्या प्रमुखांकडे आग्रह धरेन,’’ असे संगीता कामत म्हणाल्या.

महिला आणि पुरुष संघांचे सामने एकाच वेळी आल्याने महिलांच्या सामन्यांकडे दुर्लक्ष झाले, हे मी मान्य करते. मात्र मुलींच्या आंतरशालेय क्रिकेटचा दर्जा आता फार सुधारला आहे. एकाच दिवशी उपांत्य व अंतिम सामना आयोजित करण्यामागे त्यांना शारीरिकदृष्टय़ा अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट होते. त्याशिवाय प्रशिक्षकांनी किंवा खेळाडूंनी यासंबंधी तक्रारी एमसीएकडे नोंदवल्यास त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे शक्य होईल.

– संगीता कामत, ‘एमसीए’च्या महिला निवड समितीच्या अध्यक्षा