यंदाच्या हंगामात अपयशी कामगिरी झालेल्या बार्सिलोनासाठी पुन्हा एकदा लिओनेल मेसी तारणहार ठरला. त्याच्या गोलमुळे बार्सिलोनाला ला-लिगा फुटबॉलमध्ये लेवांतेवर १-० असा विजय मिळवता आला.

मेसीने ७६व्या मिनिटाला बार्सिलोनासाठी महत्त्वपूर्ण गोल केला. गेल्या दोन लढतींमध्ये बार्सिलोनाला पराभव पत्करावा लागला होता. ला-लिगामध्ये काडिझकडून ०-३ अशी घरच्या मैदानावर धक्कादायक हार स्वीकारावी लागली. पाठोपाठ चॅम्पियन्स लीगमध्येही ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटस संघाकडून बार्सिलोनाचा ०-३ असा पराभव झाला. बार्सिलोना अजून आठव्या स्थानावर असल्याने विजेतेपदाच्या शर्यतीत येण्यासाठी त्यांना आणखी विजय नोंदवावे लागतील. येत्या बुधवारी रेयाल सोशिदादशी घरच्या मैदानावर बार्सिलोनाची महत्त्वपूर्ण लढत आहे.

बार्सिलोनासमोर पॅरिस सेंट-जर्मेनचे आव्हान

चॅम्पियन्स लीग फुटबॉल

न्यॉन : चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून बार्सिलोनाची लढत फेब्रुवारीमध्ये पॅरिस सेंट जर्मेनशी होणार आहे. पॅरिस सेंट-जर्मेनला २०१७मध्ये या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच बार्सिलोनाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या वेळेस बार्सिलोनाच्या विजयात मेसी आणि नेयमार यांचे योगदान होते. मात्र नेयमार आता पॅरिस सेंट जर्मेनचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे मेसी आणि नेयमार हे दोन खेळाडू आमनेसामने येतील. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती १६ फेब्रुवारीपासून खेळण्यात येणार आहेत.

* उपउपांत्यपूर्व लढती : बायर्न म्युनिच वि. लॅझियो, बोरुसिया मॉँचेनग्लाडबाख वि. मॅँचेस्टर सिटी, अ‍ॅटलेटिको माद्रिद वि. चेल्सी, सेव्हिला वि. बोरुसिया डॉर्टमंड, अटलांटा वि. रेयाल माद्रिद, युव्हेंटस वि. पोटरे, बार्सिलोना वि. पॅरिस सेंट-जर्मेन, लिपझिग वि. लिव्हरपूल

मॅँचेस्टर युनायटेडसमोर सोशिदादचे आव्हान

युरोपा लीग फुटबॉल

मॅँचेस्टर युनायटेडसमोर युरोपा लीग फुटबॉलमध्ये ३२ संघांच्या फेरीमध्ये रेयाल सोशिदादचे आव्हान आहे. एसी मिलानची लढत रेड स्टार बेलग्रेडशी होणार आहे. अन्य बाद फेरीच्या लढतींमध्ये आयाक्स वि. लिली, डायनामो किव वि. ब्रगी, आर्सेनल वि. बेन्फिका अशा लढती होणार आहेत.