महान फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या बार्सिलोना संघामधील भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बार्सिलोनाकडून यापुढे खेळण्याबाबत मेसी समाधानी नसल्याची चर्चा आहे.

गेले दशकभर बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या मेसीचा संघासोबतचा करार जून २०२१ पर्यंत आहे. मेसीने क्लब सोडणार असल्याचे जाहीरपणे सांगितले नसले तरी संघव्यवस्थापनाच्या निर्णयांबाबत तो नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. ‘‘मेसीशी बोलणे झाले नसले तरी त्याच्या वडिलांशी बोललो आहे. मेसी बार्सिलोना संघाशी संबंधित अन्य सदस्यांप्रमाणे नाराज आहे. या अपयशाच्या कालखंडात मार्ग काढणे हे आम्हा प्रत्येकासाठी आव्हानात्मक आहे,’’ असे बार्सिलोनाचे संघाचे अध्यक्ष जोसेफ बाटरेम्यू यांनी सांगितले.

पाच दिवसांपूर्वीच बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्युनिककडून २-८ असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता.

रोनाल्ड कोमन बार्सिलोनाचे नवीन प्रशिक्षक

रोनाल्ड कोमन यांची बार्सिलोना फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. हॉलंडचे असणाऱ्या कोमन यांचा जून २०२२ पर्यंत बार्सिलोना संघाशी प्रशिक्षक म्हणून करार असणार आहे. बार्सिलोना संघाची या हंगामात निराशाजनक कामगिरी झाल्याने नव्याने प्रशिक्षक नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.