भारतीय क्रिकेट संघाच्या संचालकपदाचा १८ महिन्यांचा कार्यकाळ हा आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद आणि संस्मरणीय कालखंड होता, असे मत रवी शास्त्री यांनी प्रकट केले आहे. परंतु कराराचे नूतनीकरण व्हावे, असे वाटते का, या प्रश्नाला उत्तर देण्याचे त्यांनी टाळले आहे.
‘‘भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर संघ संचालकपदाचा कार्यकाळ हा आयुष्यातील सर्वात संस्मरणीय कालखंड होता, यात कोणतीही शंका नाही. या कालखंडात संघाने काय प्राप्त केले, त्याचे श्रेयस संघातील खेळाडूंना जाते,’’ असे शास्त्री यांनी या वेळी सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक पदासाठी जाहिरात देणार असून, याबाबत तू उत्सुक आहेस का, या प्रश्नाला शास्त्री यांनी अतिशय सावध उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘मी फक्त आयपीएलच्या अंतिम सामन्याकरिता अर्ज केला आहे.’’
ऑगस्ट २०१४मध्ये इंग्लंडविरुद्ध १-३ अशी हार पत्करल्यानंतर भारतीय संघाच्या संचालकपदाची जबाबदारी शास्त्री यांच्याकडे सोपवण्यात आली. वर्षांरंभी झालेल्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत त्यांनी हा पदभार सांभाळला.
‘‘मी एक यशस्वी खेळाडू म्हणून स्वत:ची गणना करीन. १९८५ची विश्व अजिंक्यपद स्पर्धा, १९८३चा विश्वचषक हे माझ्या कारकीर्दीतील अभिमानास्पद क्षण. माझ्या संघ संचालकपदाच्या कारकीर्दीतसुद्धा अशाच प्रकारची विशेष कामगिरी भारताची झाली,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.
‘‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये आम्ही इंग्लंडला त्यांच्या देशात हरवले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या देशात प्रथमच ३-० असे निभ्रेळ यश मिळवले, श्रीलंकेत २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली आणि दशकानंतर दक्षिण आफ्रिकेला घरगुती मालिकेत पराभूत केले. जेव्हा तुमच्याकडे एखादी जबाबदारी सोपवली जाते, तेव्हा तुम्ही स्वत:ची लक्ष्ये निश्चित करता. परंतु तुम्ही सर्व काही मिळवू शकाल का, याची मुळीच खात्री नसते,’’ असे शास्त्री या वेळी म्हणाले.
या कार्यकाळातील सर्वात यशस्वी क्षण कोणता, हे सांगायचे मात्र त्यांनी टाळले. शास्त्री म्हणाले, ‘‘हे प्रसारमाध्यमांनी ठरवायचे. कारण मला तुलना करायला अजिबात आवडत नाही.’’
भारतीय संघाच्या यशासाठी तुम्ही कानमंत्र दिलात का, या प्रश्नाबाबत शास्त्री यांनी सांगितले की, ‘‘बऱ्याच दिवसांपूर्वी माझे याबाबत बीसीसीआयशी बोलणे झाले होते. मी माझा अहवाल त्यांच्याकडे दिला होता. या पलीकडे मी काहीच सांगू शकणार नाही.’’
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीवर शास्त्री यांनी स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. ते म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियातील चार कसोटी सामन्यांतील चार शतकांना तोडच नव्हती. आयपीएलमध्येही तो दिमाखदार फलंदाजी करीत आहे. चार शतकांसह जवळपास एक हजार धावा त्याच्या खात्यावर आहेत. २८ ते ३२ वष्रे हा कोणत्याही आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या कारकीर्दीतील बहराचा काळ असतो. विराटच्या आयुष्यातील तोच काळ सुरू आहे. कोहली आता फक्त २७ वर्षांचा आहे. लवकरच तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व सांभाळेल.’