देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी करोनाशी लढताना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींचं कौतुक करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता घराच्या खिडकीत येत टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. आजही खबरदारीचा उपाय म्हणून करोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मध्य प्रदेशचा क्रिकेटपटू आनंद राजन याचे वडिल सध्या इराणमध्ये अकडले आहेत. करोनाशी लढताना सध्याच्या घडीला इराणला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारच्या नवीन नियमांप्रमाणे आनंद राजनच्या वडिलांना भारतातही परतता येत नाहीये. त्यामुळे आनंदचे कुटुंबिय सध्या चिंतेत आहेत. आनंदने आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळला आहे.

करोनामुळे इराणचा सध्याच्या घडीला जगाशी संपर्क तुटलेला आहे. “इराणमध्ये अडकलेल्या अनेक भारतीयंना केंद्र सरकार परत आणतंय, माझे बाबाही लवकरच परत येतील अशी मला आशा आहे. काही दिवसांपूर्वी बाबांशी बोलणं झालं होतं, त्यावेळी ज्या लोकांनी स्वतःची वैद्यकीय चाचणी करवुन घेतली आहे अशाच लोकांना भारतात पाठवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. इराणमधील भारतीय दुतावासातही वैद्यकीय चाचणीसाठी पुरेशी सामुग्री नाहीये. वेळ खूप कमी आहे, पुढील आठवड्यापर्यंत एकही विमान भारतात परतणार नाहीये…त्यामुळे नेमकं काय होईल आम्हालाही माहिती नाही.” आपल्या वडिलांविषयी बोलताना आनंदने इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला माहिती दिली.

आनंद राजन हा मध्यमगती गोलंदाज आहे. मध्य प्रदेशकडून आतापर्यंत तो ४० प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. आपल्या वडिलांची इराणमधून सुटका व्हावी यासाठी आनंद सोशल मीडियावरही संबंधित अधिकाऱ्यांना सतत ट्विट करत मदत मागतो आहे.

मात्र कोणत्याही अधिकाऱ्याकडून आनंदला ठोस उत्तर मिळत नाहीये. गेली ८ वर्ष आनंदचे वडिल तेहरानमध्ये कामाला आहेत. सुदैवाने आतापर्यंत त्यांना कसलाच त्रास जाणवत नाहीये. मात्र आजुबाजूची परिस्थिती पाहता, त्यांना भारतात परतायचं आहे. सध्या भारतीय सरकार जपान, इटली यासारख्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयंना विशेष विमानाने भारतात परत आणत आहे. त्यामुळे आपले बाबाही एकदिवस लवकर भारतात येतील ही आशा आनंदच्या मनात कायम आहे.