काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. काही आठवडे ही आग तशीच राहिल्यामुळे अनेक वन्य-प्राण्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारच्या सर्व यंत्रणांनी प्रयत्नांची शिकस्त केली, त्यातच वरुणराजाने दिलेली साथ या जोरावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आलं. मात्र या घटनेत ऑस्ट्रेलियाच्या वनसंपदेचं आणि वन्य-प्राण्याचं मोठं नुकसान झालं.

अनेक प्राण्यांना या आगीतून वाचवण्यात आलेलं आहे. झालेली घटना विसरुन मदतकार्यासाठी पैसा उभा करायला ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आता मैदानात आलेले आहेत. माजी फिरकीपटू शेन वॉर्नने वणव्यानंतरच्या मदतकार्यासाठी पैसा उभा करायला, Bushfire Cricket League या सामन्याचं आयोजन केलं आहे. वॉर्न आणि रिकी पाँटींग हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू संघांचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. या सामन्यात खेळण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सध्या संघाबाहेर असलेल्या महेंद्रसिंह धोनीलाही विचारण्यात आलेलं आहे.

“मला आशा आहे की आणखी काही मोठी नाव यात सहभागी होतील. संगीत, खेळ, चित्रपट यासारख्या सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी या कार्यात सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहेत.” The Guardian वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वॉर्नने स्पष्टीकरण दिलं. यावेळी रिकी पाँटींगनेही घडलेल्या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त केलं.

“ऑस्ट्रेलियासाठी हा प्रसंग अतिशय खडतर आहे. इतर खेळाडू यात सहभागी होतील का हे आम्ही फक्त विचारु शकतो. ज्या-ज्या खेळाडूंनी आतापर्यंत ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळलंय त्या सर्वांना इथे काही क्षण आनंदाचे मिळाले असतील. त्यामुळे या कार्यात लोकं सहभागी होतील अशी मला आशा आहे.” ८ जानेवारी रोजी Big Bash league स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी हा सामना खेळवला जाईल.