भारतीय संघ ३ ऑगस्टपासून विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी रविवारी संघाची घोषणा करण्यात आली. विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी निवृत्त होईल अशी अनेकांना अपेक्षा होती, पण त्याने निवृत्ती न घेता काही कालावधीची विश्रांती घेण्याचे ठरवले. त्यामुळे विंडीज दौऱ्यासाठी धोनीचा विचार करण्यात आला नाही. याबाबत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने आपले मत व्यक्त केले आहे.

“धोनीला काही काळ क्रिकेटपासून विश्रांती हवी आहे. पण मला असं वाटतं की निवडकर्त्यांनी धोनीची भेट घेऊन त्याच्याशी चर्चा करावी. तसे न झाल्यास पुन्हा धोनीने निवृत्ती घ्यावी की घेऊ नये, याबाबत चर्चांना उधाण येईल. त्यामुळे धोनीसारख्या मोठ्या खेळाडूंशी निवड समिती सदस्यांनी स्वतः चर्चा केली पाहिजे”, असे अझरुद्दीन म्हणाला. हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या संदर्भातील बैठकीत सोमवारी त्याने हे मत मांडले.

“वय वाढतं तसं मैदानावरील क्रिया-प्रतिक्रियांचा वेग मंदावतो. पण माझं वैयक्तिक मत विचारात घेतलं तर धोनी ज्या आक्रमक फलंदाजी शैली साठी ओळखला जातो, त्याच आक्रमकतेने त्याला खेळताना पाहायला मला आवडेल. कारण तो उत्कृष्ट असा क्रिकेटपटू आहे”, असेही अझर म्हणाला.

अंबाती रायडूच्या मुद्यावरही अझरने मत मांडलं. “निवड समिती अध्यक्ष एम एस के प्रसाद यांच्या स्पष्टीकरणाबाबत मी अजिबात समाधानी नाही. संघाला सलामीवीर हवा आहे, असे स्पष्टीकरण देणे अजिबातच पटण्यासारखे नाही. मी जेव्हा संघाचा कर्णधार होतो, तेव्हा अनेकदा मला हवा असलेला संघ देण्यास मला निवड समितीने नकार दिला होता. त्याचप्रमाणे एम एस के प्रसाद यांनी कर्णधार किंवा प्रशिक्षक यांच्या दबावाखाली रायडू बाबतचा निर्णय घ्यायला नको होता”, असेही अझरने नमूद केले.