आयपीएलची १० पर्व यशस्वीपणे पार पडल्यानंतर आगामी अकराव्या हंगामासाठी खेळाडूंचा पुन्हा लिलाव होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मुंबई इंडियन्सचा संघ अकराव्या हंगामात श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाला आपल्या संघात कायम राखण्यासाठी उत्सुक नाहीये. अकराव्या हंगामात प्रत्येक संघमालकांना ३ खेळाडूंना कायम राखण्याची मुभा मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये लसिथ मलिंगाचं वाढतं वय आणि दुखापतींमुळे गोलंदाजीवर होणारा परिणाम पाहता, मुंबई इंडियन्स त्याला आपल्या संघात कायम ठेवण्यास उत्सुक नसल्याचं समजतंय. ‘क्रिकेट एज’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, लसिथ मलिंगाला पुन्हा लिलावात उतरवून गरजेनुसार त्याला खरेदी करण्याचा पर्याय मुंबई इंडियन्सच्या प्रशासनाने राखून ठेवला आहे.

लसिथ मलिंगा हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज मानला जातो. ११० सामन्यांमध्ये लसिथ मलिंगाच्या नावावर १५४ बळी जमा आहेत. मुंबईला २०१३ आणि २०१५ साली मिळालेल्या विजेतेपदांमध्ये मलिंगाचा वाटा हा महत्वाचा मानला जातो. मात्र, २०१७ साली लसिथ मलिंगाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. १२ सामन्यांमध्ये मलिंगाने केवळ ११ बळी मिळवले. त्यामुळे अकराव्या हंगामात मलिंगाला कायम राखण्यात मुंबई इंडियन्सचं प्रशासन उत्सुक नसल्याचं कळतंय.

अवश्य वाचा – मुंबई इंडियन्स सोडण्याचा विचारही करत नाही – हार्दिक पांड्या

लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमहार आणि मिचेल मॅक्लेघेननने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधला सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या संघापैकी एक मानला जातो. २०१८ साली फेब्रुवारी महिन्यात आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. त्यामुळे या लिलावात मुंबई इंडियन्स आणि इतर संघ नेमकी कुठली रणनीती आखणार, हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – चेन्नई सुपरकिंग्ज धोनी, आश्विनला संघात कायम ठेवणार; रैनाला डच्चू मिळण्याचे संकेत