मुंबई क्रिकेटमध्ये फिक्सिंगचा प्रयत्न झाला आहे. टी २० मुंबई लीग स्पर्धेत खराब प्रदर्शन करण्यासाठी मुंबईच्या रणजी संघातील एका खेळाडूशी संपर्क साधण्यात आला होता. या खेळाडूने मुंबई क्रिकेट असोशिएशनला या प्रकाराची माहिती दिली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या मालकाने खराब प्रदर्शन करण्यासाठी या खेळाडूशी संपर्क साधला होता. टी २० मुंबई लीग स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या सामन्याआधी ही घटना घडली होती. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

मुंबई क्रिकेट असोशिएशन लवकरच बीसीसीआच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला याची माहिती देणार आहे. मागच्या महिन्यात १४ मे ते २६ मे दरम्यान टी २० मुंबई लीग स्पर्धेचा दुसरा मोसम पार पडला. बीसीसीआयने या स्पर्धेला मान्यता दिलेली आहे. या स्पर्धेचे सर्व सामने वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आले. ज्याचे थेट प्रक्षेपण स्टास स्पोटर्स वाहिनीवरुन करण्यात आले.

आठ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. नॉर्थ मुंबई पँथर्स, आर्क्स अंधेरी, सोबो सुपरसॉनिक्स, आकाश टायगर्स हे चार संघ उपांत्यफेरीत पोहोचले होते. देशांतर्गत टी२० लीग स्पर्धांमधील भ्रष्टाचार संपवण्यासाठी मागच्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सीओए समितीने अशा स्पर्धा भरवणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांसाठी मार्गदर्शकतत्वे जारी केली होती.

त्यामध्ये संघ मालक, अधिकारी, व्यवस्थापक आणि प्रायोजक यांची सविस्तर माहिती द्यायला सांगितली होती. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे भ्रष्टाचार विरोधी पथक असून क्रिकेटपटू अशा जाळयात सापडू नयेत यासाठी ते सत्र आयोजित करत असतात.