‘‘श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड या दोघांनी गेल्या मोसमात नेत्रदीपक कामगिरी केली होती; पण या मोसमाच्या सलामीच्या लढतीला ते नसतील. त्यांची उणीव आम्हाला जाणवेल, पण त्यामुळे युवा खेळाडूंना या सामन्यात संधी मिळेल,’’ असे मुंबईचा कर्णधार आदित्य तरेने तामीळनाडूविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या सलामीच्या लढतीपूर्वी सांगितले.

मुंबई आणि तामीळनाडू यांच्यातील पहिली लढत लाहिलीच्या मैदानात होणार आहे. ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक समजली जाते. त्यामुळे दोन्ही संघांच्या गोलंदाजीवर सामनाचा निर्णय मुख्यत्वेकरून अवलंबून असेल. मुंबईची मध्यमगती गोलंदाजीची मदार धवल कुलकर्णी बलविंदर सिंग संधू यांच्यावर मुख्यत्वेकरून असेल.  वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांचा भारतीय संघात समावेश झाल्याने ते मुंबई संघाबरोबर नसतील. त्याचबरोबर फिरकीची मदार विशाल दाभोळकरवर असेल. कर्णधार आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर यांच्यासारखे अनुभवी फलंदाज मुंबईकडे आहेत. त्यांना अखिल हेरवाडकर, जय बिश्ता, अरमान जाफर आणि कौस्तुभ पवार या युवा फलंदाजांची चांगली साथ मिळू शकेल.

मुंंबईपेक्षा तामीळनाडूच्या संघात अधिक अनुभवी खेळाडू आहेत. कर्णधार अभिनव मुकुंद, दिनेश कार्तिक, बाबा अपराजित यांच्यासारखे स्थानिक स्पर्धामध्ये सातत्याने धावा काढणारे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर, बी. इंद्रजित, अश्विन ख्रिस्त, कौशिक गांधी यांनीही गेल्या मोसमामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली होती.

दोन्ही संघांवर नजर फिरवल्यास मुंबईपेक्षा तामीळनाडूचा संघ किंचितसा वरचढ दिसत आहे; पण मुंबईने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केल्यास त्यांना तामीळनाडूवर मात करणे अशक्य नसेल.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई : आदित्य तरे (कर्णधार, यष्टिरक्षक), अभिषेक नायर, धवल कुलकर्णी, सूर्यकुमार यादव, निखिल पाटील (कनिष्ठ), अखिल हेरवाडकर, जय बिस्ता, अरमान जाफर, कौस्तुभ पवार, सुफियान शेख, बलविंदर सिंग संधू, तुषार देशपांडे, विशाल दाभोळकर, विजय गोहिल.

तामीळनाडू : अभिनव मुकुंद (कर्णधार), बाबा अपराजित, बी. इंद्रजित, एसएस वॉशिंग्टन सुंदर, एन. जगदीशन, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), जे. कौशिक, एल. सूर्यप्रकाश, राहिल शाह, मालोलन रंगराजन, औशिक श्रीनिवासन, अश्विन ख्रिस्त, एम. मोहम्मद, के. विग्नेश, टी. नटराजन, कौशिक गांधी.

महाराष्ट्राची आज झारखंडपुढे कसोटी

घरच्या मैदानांऐवजी त्रयस्थ ठिकाणी असलेल्या मैदानावर महाराष्ट्राचे खेळाडू झारखंडविरुद्ध कशी कामगिरी करतात, हीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या दोन संघांमधील चार दिवसांच्या रणजी क्रिकेट सामन्याला येथील रेल्वे मैदानावर गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधवकडे महाराष्ट्राचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याच्यासह हर्षद खडीवाले, राहुल त्रिपाठी, स्वप्निल गुगळे, यष्टिरक्षक विशांत मोरे, अंकित बावणे, चिराग खुराणा यांच्यावर महाराष्ट्राच्या फलंदाजीची मदार आहे. गोलंदाजीत श्रीकांत मुंडे, डॉमिनिक मुथ्थूस्वामी, अनुपम संकलेचा, सत्यजित बच्छाव यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.

झारखंड संघाच्या फलंदाजीची मुख्य मदार सौरभ तिवारी, एस.पी.गौतम, इशान जग्गी, प्रत्युष सिंग व आनंद सिंग यांच्यावर आहे. प्रत्युष सिंगने गत वर्षी २३ वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. झारखंडचे कर्णधारपद आंतरराष्ट्रीय गोलंदाज वरुण आरोन याच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्याच्याबरोबरच शहबाज नदीम, समर कादरी यांच्याकडून गोलंदाजीत मोठय़ा आशा आहेत.