छत्रपती शिवाजी कबड्डी स्पर्धा

उत्कंठापूर्ण लढतीत पुणे संघाने मुंबई उपनगर संघाला २८-२२ असे हरवत व छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेतील महिलांचे विजेतेपद राखले. पुरुषांचे विजेतेपद मिळवताना मुंबई शहर संघाने ठाणे संघाचे आव्हान ३७-२२ असे परतवले.

संत गोदड महाराज क्रीडानगरीत आयोजित केलेल्या या स्पर्धेतील दोन्ही अंतिम सामने चुरशीने खेळले गेले. दोन वर्षांपूर्वी पुण्याने मुंबई उपनगरचा पराभव करीत या स्पर्धेतील महिलांचे विजेतेपद पटकावले होते. तीच परंपरा त्यांनी येथेही कायम राखली.

दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. पूर्वार्धात मुंबई संघाकडे १४-१२ अशी दोन गुणांची आघाडी होती. उत्तरार्धाच्या सुरुवातीला पुणे संघाने १४-१४ अशी बरोबरी केली. त्यानंतर शेवटपर्यंत चुरस कायम होती. पुण्याच्या विजयात श्रद्धा चव्हाण व कोमल गुजर यांनी केलेल्या अष्टपैलू खेळाचा मोठा वाटा होता. मुंबईच्या सायली नागवेकरने उत्कृष्ट खेळ करीत संघाला विजेतेपद मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र तिला अन्य खेळाडूंकडून अपेक्षेइतकी साथ शेवटच्या दोन तीन मिनिटांमध्ये मिळाली नाही.

पुरुष गटातील अंतिम सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये १४-१४ अशी बरोबरी होती. ओंकार जाधव व संकेत सावंत यांनी उत्तरार्धात चौफेर चढाया व उत्कृष्ट पकडी करीत मुंबईला आघाडी मिळवून दिली. ठाण्याच्या उमेश म्हात्रे व अक्षय भोईटे यांनी ही आघाडी कमी करण्यासाठी चिवट झुंज दिली. परंतु मुंबईने सामन्यावरील पकड कायम ठेवली.