क्रिकेटमधील शिखर संघटनेकडून घटनेची पायमल्ली करण्यात आली आहे, अशा शब्दांत तीव्र निषेध प्रकट करून मुस्तफा कमाल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ऑस्ट्रेलियाला आयसीसी विश्वचषक प्रदान करण्याचा अधिकार हिरावल्यामुळे कमाल यांनी पदत्याग करताना आयसीसीचे कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना ‘वादग्रस्त आणि कुजका’ संबोधले.

‘‘मी माझा राजीनामा आयसीसीकडे पाठवला आहे. आयसीसीच्या घटनेनुसार कार्य होत नसेल तर या ठिकाणी काम करणे योग्य ठरणार नाही,’’ असे कमाल यांनी हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत सांगितले.
‘‘श्रीनिवासन हा कुजका आणि वादग्रस्त व्यक्ती आहे. आयसीसीला आता ‘इंडियन क्रिकेट काऊन्सिल’ असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अशा प्रकारच्या माणसांनी खरे तर क्रिकेटपासून दूर राहायला हवे. ही माणसे क्रिकेटचे वातावरण गढूळ करीत आहेत. मला राजीनामा देणे का भाग पडले, याच्या कारणांचा आयसीसीने गांभीर्याने विचार करावा, ही माझी विनंती आहे,’’ असे कमाल यांनी सांगितले.
रविवारी मेलबर्नला झालेल्या अंतिम सामन्यानंतर कमाल यांच्या हस्ते विश्वविजेतेपद प्रदान करण्यात येऊ नये, अशा आशयाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अंतिम सामना संपण्याआधीच कमाल यांनी मैदान सोडले होते. आयसीसीचे कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या हस्ते ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कला विश्वचषक प्रदान करण्यात आला.
विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा भारताकडून पराभव झाल्यानंतर सदोष पंचगिरीबाबत कमाल यांनी ताशेरे ओढले होते. त्यानंतर आयसीसीने हे आरोप फेटाळणारे पत्रक काढले होते. कमाल यांच्या वक्तव्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांना विश्वचषक देण्याचा सन्मान नाकारण्यात आला.
आयसीसीच्या जानेवारी २०१५मध्ये बिनविरोधपणे मान्य झालेल्या ठरावानुसार, जागतिक स्पर्धामध्ये आयसीसी अध्यक्ष चषक प्रदान करेल. आयसीसीचे अध्यक्ष हे औपचारिक प्रमुख असतील, परंतु प्रशासकीय सत्ता मात्र कार्याध्यक्षांकडे असेल. १९९६पर्यंत विश्वचषक हा अनेकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आयसीसीच्या प्रमुखाच्याच हस्ते देण्याची प्रथा तोवर अस्तित्वात नव्हती.
देशात दाखल झाल्यानंतर बुधवारी कमाल नाटय़मयरीत्या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. तिथे एका पत्रकाराने त्यांना या घटनेच्या निषेधार्थ पदाचा राजीनामा देणार का, असा प्रश्न विचारला. यावर एका पत्रकाराने ‘‘होय, तुम्ही राजीनामा द्यायलाच हवा,’’ असे म्हटले. त्यावर उत्तर देताना कमाल म्हणाले, ‘‘ठीक आहे, मी आता तेच करायचे ठरवले आहे.’’
‘‘माझ्या राजीनाम्यासह मी अन्यायाविरोधात न्याय मागण्याचा प्रयत्न करीत आहे. विश्वचषक प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ९३ हजार क्रिकेटरसिकांनी मेलबर्न क्रिकेट असोसिएशनवर श्रीनिवासन यांचा धिक्कार केला,’’ असे कमाल यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक आरोप असलेल्या व्यक्तीच्या हाती क्रिकेटचे भवितव्य असणे, ही गोष्ट चिंताजनक आहे.’’

मी आयसीसीची माफी मागावी किंवा आपले निवेदन मागे घ्यावे, अन्यथा विश्वचषक प्रदान करता येणार नाही, असे मला सांगण्यात आले. मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे माझी झोपच उडाली. कारण माझा अधिकार हिरावण्यात आला. मी निवेदन मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
-मुस्तफा कमाल, बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष

कमाल यांचा राजीनामा आयसीसीकडून मंजूर
दुबई : मुस्तफा कमाल यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा आयसीसीने तातडीने मंजूर केला आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमाल यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, ‘‘मी आयसीसीची दिलगिरी प्रकट करतो. माझी कुणाबाबतही तक्रार नाही. मी वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत आहे.’’ दुबईमध्ये १५ आणि १६ एप्रिलला होणाऱ्या आयसीसी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये रिक्त झालेल्या अध्यक्षपदाचा निर्णय होईल.