अमली पदार्थ सेवनाच्या आरोपाखाली संशयित असलेला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग याची उत्तेजक चाचणी घेण्यास राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) नकार दिल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालय संभ्रमात पडले आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीस (नाडा) त्याची उत्तेजक चाचणी घेण्यास सांगितले आहे. विजेंदर याने डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत १२ वेळा हेरॉईन घेतले असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. विजेंदर याच्यावर अमली पदार्थाच्या व्यापारात अडकला असल्याचा आरोप ठेवल्यानंतर एक महिन्याने क्रीडा मंत्रालयास जाग आली आहे. मंत्रालयाने नाडाचे सरसंचालक मुकुल चटर्जी यांना पत्र लिहून विजेंदरची वैद्यकीय चाचणी घेण्याचे कळविले होते.
‘नाडा’ ही स्वायत्त संस्था आहे. कोणतीही स्पर्धा सुरु नसताना विजेंदरची उत्तेजक चाचणी घेण्याची त्यांची तयारी होती, मात्र हेरॉईनबाबत चाचणी घेणे हे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (वाडा) च्या नियमावलीत बसत नसल्यामुळे आपण ही चाचणी घेऊ शकत नाही असे नाडाने कळविले आहे, असे चटर्जी यांनी क्रीडा मंत्रालयास कळविले आहे. ते म्हणाले, आम्ही वाडाची नियमावलीचे उल्लंघन करु शकत नाही. जर त्यांच्याकडून परवानगी आली तर आम्ही नियमानुसार विजेंदरची रक्त व लघवीची तपासणी करु. ही चाचणी केव्हा व कोठे घ्यायची याचा तपशील आम्ही प्रसिद्ध करु शकत नाही. वाडाने बंदी घातलेल्या उत्तेजक पदार्थामध्ये हेरॉईनचा समावेश नाही. विजेंदरची यापूर्वी जुलै-ऑगस्ट २०१२ मध्ये उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये तो निदरेष आढळला होता. रक्त व लघवीची तपासणी घेणे सोपे आहे, मात्र केसांची चाचणी घेणे हे खूप वेळखाऊ काम आहे.