शतकवीर विहारी आणि पुजाराने डाव सावरला

हॅमिल्टन : हनुमा विहारीचे झुंजार शतक आणि चेतेश्वर पुजाराची ९२ धावांची खेळी वगळता न्यूझीलंड एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी बाकी फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. चेंडूला वेग आणि उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर मयांक अगरवाल (१), पृथ्वी शॉ (०) आणि शुभमन गिल (०) हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरले.

कर्णधार विराट कोहलीने सराव सामन्याऐवजी नेटमधील सत्राला प्राधान्य दिले. भारताचा पहिला डाव पहिल्या दिवशी २६३ धावांत आटोपला. विहारी १०१ धावांवर माघारी परतला. न्यूझीलंडकडून स्कॉट कुगेलिनने ४० धावांत तीन बळी घेतले.

तिन्ही सलामीवीर अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन चिंतेत सापडले आहे. खेळपट्टीवरील अतिरिक्त उसळीपुढे पृथ्वी आणि शुभमनचा निभाव लागला नाही, तर मयांकला वेगवान चेंडूचा प्रतिकार करता आला नाही. कुगेलिनच्या गोलंदाजीवर पृथ्वीचा शॉर्ट लेगला रचिन रवींद्रने झेल टिपला, तर मयांकच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टिरक्षक डेन क्लेव्हरच्या हाती विसावला. कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या शुभमनचा टिम सेफर्टने गलीमध्ये झेल टिपला. त्यामुळे भारताची ३ बाद ५ अशी केविलवाणी अवस्था झाली.

पहिल्या तासाभरातच अजिंक्य रहाणेसुद्धा (१८) माघारी परतला. जिम्मी नीशामच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये टॉम ब्रूसने त्याचा झेल घेतला. मग विहारी आणि पुजारा यांनी पाचव्या गडय़ासाठी १९५ धावांची भागीदारी केली. पुजाराचे शतक हुकले. पण हे दोन फलंदाज तंबूत परतल्यानंतर भारताचे सहा फलंदाज ३० धावांत बाद झाल्यामुळे उत्तरार्धात पुन्हा अवस्था बिकट झाली.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ७८.५ षटकांत सर्व बाद २६३ (हनुमा विहारी १०१, चेतेश्वर पुजारा ९२; स्कॉट कुगेलिन ३/४०)

गरजेनुसार सलामीला उतरेन -विहारी

हॅमिल्टन : न्यूझीलंडच्या दुसऱ्य फळीतील गोलंदाजीच्या माऱ्यासमोर भारताचे अननुभवी सलामीचे पर्याय तांत्रिकदृष्टय़ा अपयशी ठरले. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने विचारल्यास सलामीला फलंदाजीस उतरू शकेन, असे मत हनुमा विहारीने शुक्रवारी व्यक्त केले.

सलामीवीर मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे सलामीवीर अपयशी ठरले असताना सहाव्या क्रमांकावरील विहारीने शतक झळकावले. सलामीवीरांची सराव सामन्यातील कामगिरी पाहता नील व्ॉगनर, ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांच्यासारख्या गोलंदाजांपुढे त्यांचा कसा निभाव लागेल, हा प्रश्नचिन्ह झाले आहे.

‘‘संघातील खेळाडू म्हणून कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला मी उतरू शकेन. सध्या तरी मला यासंदर्भात कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. परंतु संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला उतरेन,’’ असे विहारी १०१ धावांच्या खेळीनंतर म्हणाला.