ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका

पर्थ : डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (४/४५) आणि अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन (४/६३) या दोघांनी दुसऱ्या डावात मिळवलेल्या प्रत्येकी चार बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रकाशझोतातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा २९६ धावांनी दणदणीत पराभव केला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव १७१ धावांत संपुष्टात आला. बीजे वॉटलिंग (४०) आणि कॉलिन डी ग्रँडहोम (३३) यांनी न्यूझीलंडचा पराभव टाळण्यासाठी कडवा प्रतिकार केला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ९ बाद २१७ धावांवर घोषित केला. दोन्ही डावांत मिळून नऊ बळी मिळवणारा स्टार्क सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.