टेनिसस्टार नोव्हाक जोकोविच हा आगामी अमेरिकन ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. करोनाचा धोका असल्यामुळे अनेक बड्या टेनिसपटूंनी न्यूयॉर्कला जाण्याचे टाळले आहे. गतविजेता राफेल नडालनेदेखील या स्पर्धेतून माघार घेतली आहे. सर्वाधिक २० वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा रॉजर फेडररदेखील गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी २०२०मध्ये कोणतीही स्पर्धा खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. तरीदेखील एका महत्त्वाच्या कारणास्तव जोकोविचने US OPENमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

फेडरर आणि नडाल हे दोन बलाढ्य स्पर्धक US OPENमध्ये खेळणार नाहीत हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे तुलनेने सोपे आव्हान स्वीकारण्याच्या दृष्टीने नोव्हाक जोकोविचने करोनाचा धोका पत्करून स्पर्धेत हजेरी लावण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. जोकोविचच्या नावावर १७ ग्रँड स्लॅम विजेतेपदं आहेत. या स्पर्धेतील विजेतेपदामुळे त्याच्यातील आणि फेडररमधील ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जोकोविच हा धोका पत्करत असल्याची चर्चा आहे.

जोकोविचनेदेखील हा संदर्भात आपलं मत व्यक्त केलं. “मी असं म्हणणार नाही की माझ्या स्पर्धेतील सहभागामागे हेच मुख्य कारण आहे. पण काही महत्त्वाच्या कारणांपैकी हेदेखील एक कारण नक्कीच आहे. मी पण स्पर्धेतून माघार घेण्याच्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलोच होतो. पण नंतर मी असा विचार केला की मला खेळायचं आहे. वैयक्तिक स्तरावर मी धाडसी निर्णय घ्यायला अजिबात घाबरत नाही. मला जर यात खूपच धोका वाटला असता तर मी नक्कीच स्पर्धेत सहभागी झालो नसतो”, असे जोकोविच म्हणाला.