विम्बल्डन स्पध्रेतील पराभवानंतर जोकोव्हिचचा निर्धार

विम्बल्डन टेनिस स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या सॅम क्युरीकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने पुढच्या स्पर्धामध्ये नेहमीपेक्षा अधिक जबरदस्त पुनरागमन करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. गेल्या आठवडय़ात ऑल इंग्लंड क्लब येथे दाखल झालेला जोकोव्हिच सलग तिसऱ्यांदा विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज होता, परंतु त्याची ही घोडदौड क्युरीने तिसऱ्या फेरीतच रोखली.

जोकोव्हिचने चार महत्त्वाच्या स्पध्रेची जेतेपद पटकावली आहेत आणि याआधी खेळलेल्या २८ ग्रँड स्लॅम स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला आहे. त्यामुळे हा निकाल २९ वर्षीय जोकोव्हिचला आश्चर्यचकित करणारा आहे. ‘‘मी आयुष्यात सकारात्मक विचार करतो. मी सलग चार गँड्र स्लॅम जिंकण्यात यश मिळवले. त्यामुळे अपयशापेक्षा यशावर लक्ष केंद्रित करण्याचा माझा प्रयत्न आहे,’’ असे जोकोव्हिच म्हणाला.

‘‘गँड्र स्लॅम स्पध्रेतील हा माझा पहिलाच पराभव नाही. त्यामुळे पुढे काय करायचे, याची कल्पना मला आहे. हा पराभव निराशाजनक आहेच. गँड्र स्लॅममध्ये पराभूत होणे हे इतर स्पध्रेतील पराभवापेक्षा अधिक वेदनादायी असते. त्यात काडीमात्र शंका नाही. हरणे मला आवडत नाही, परंतु मी पुढे अधिक चांगल्या मजबुतीने पुनरागमन करेन,’’ असे जोकोव्हिच म्हणाला.

क्युरीकडून पराभूत झाल्यानंतर जोकोव्हिचवर प्रश्नांचा भडिमार झाला. त्याच्या एकदम सुस्तावलेल्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यावर फ्रेंच खुल्या स्पध्रेनंतर मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत असल्याचे त्याने सांगितले. अँडी मरेला पराभूत करून पहिल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या जोकोव्हिचने विम्बल्डनमध्ये खेळणे सोपे नसल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, ‘‘वर्षभरात चार ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची भावना विस्मयकारक आहे, परंतु विम्बल्डनमध्ये खेळणे हे मानसिकदृष्टय़ा सोपे नसल्याची कल्पना मला होती. या स्पध्रेचे महत्त्व सांगायचे झाल्यास, तुम्ही प्रत्येक वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असता.’’