रोमहर्षक सामन्यात त्सित्सिपासवर मात करत जेतेपद

पॅरिस : पहिले दोन सेट गमावल्यानंतरही विजयश्री कशी खेचून आणावी, हे अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने दाखवून दिले. तब्बल सव्वाचार तास झुंज देत चाहत्यांना अविस्मरणीय खेळाचा आनंद देणाऱ्या जोकोव्हिचने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोकोव्हिचने अंतिम फेरीत जोमाने मुसंडी मारत त्सित्सिपासवर ६-७ (६/८), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशी बाजी मारली. जोकोव्हिचचे हे फ्रेंच खुल्या स्पर्धेचे दुसरे तर कारकीर्दीतील एकूण १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणाऱ्या राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यापेक्षा तो एका ग्रँडस्लॅम जेतेपदाने मागे आहे. त्याचबरोबर कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पटकावणारा जोकोव्हिच हा खुल्या पर्वामधील पहिला टेनिसपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेची नऊ, विम्बल्डनची पाच आणि अमेरिकन स्पर्धेची तीन आणि आता फ्रेंच स्पर्धेची दोन जेतेपदे त्याच्या नावावर आहेत.

जोकोव्हिचचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. महान टेनिसपटू ब्योन बोर्ग यांच्या हस्ते जोकोव्हिचला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरवण्यात आले. उपांत्य फेरीत राफेल नदालशी चार तास लढत दिल्यानंतर अंतिम फेरीत जोकोव्हिचला चांगली सुरुवात करता आली नाही. त्सित्सिपासने तोडीस तोड खेळ करत पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ६-२ अशी सहज बाजी मारत त्सित्सिपासने २-० अशी आघाडी घेतली. त्सित्सिपास पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालणार, असे वाटत असतानाच जोकोव्हिचचा भन्नाट खेळ पाहायला मिळाला. पुढील तिन्ही सेटमध्ये त्सित्सिपासचा कडवा प्रतिकार मोडून काढत जोकोव्हिचने जेतेपदावर नाव कोरले.