* भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात *  विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ रडारवर

ऑस्ट्रेलिया आक्रमक, तर भारत सौम्य, असे स्वभाव दोन्ही संघांचे काही वर्षांपूर्वीचे; पण सध्याचे दोन्ही संघ पाहा. विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ, दोघेही आक्रमकता कोळून प्यायलेले. अरे ला कारे म्हणणारे, विजयासाठी जिवाचे रान करणारे. पराभव हा शब्द दोघांच्याही शब्दकोशात नाही. त्यामुळे रविवारपासून सुरू होणारी पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी हे दोन्ही शिलेदार सारे रान पेटवून टाकण्याच्या ईर्षेनेच उतरणार आहेत. त्यामुळे या मालिकेत कोणत्या कर्णधाराच्या आक्रमकतेला विजयाची किनार मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जगभरातील क्रिकेटमालिकांमध्ये हुकमत गाजवणारा भारतीय संघ रविवारी २०१७ च्या हंगामात मायदेशातील पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. श्रीलंकेला चारीमुंडय़ा चीत केल्यावर भारतीय संघासमोर घरच्या प्रेक्षकांसमोर बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. त्यात त्यांना केवळ सातत्यपूर्ण खेळाचेच नाही, तर निभ्रेळ यशाचे दुहेरी आव्हान पेलावे लागणार आहे.

श्रीलंकेच्या दुय्यम संघाविरुद्ध दाखवलेली मर्दुमकी ऑस्ट्रेलियासमोर दाखवण्यात अर्थ नाही, याची जाण भारतीय संघाला असेलच. चिवट खेळ करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ कोणत्याही क्षणाला सामन्याचे चित्र बदलू शकतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आक्रसताळेपणापेक्षा चतुराईने खेळ करणे गरजेचे आहे, याचे भान विराटने राखायला हवे. रविवारी उभय संघांतील पाच एकदिवसीय सामन्यांतील पहिला सामना चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

रोहित शर्मा आणि कोहली हे दोघेही सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. रोहितने श्रीलंकेत दोन शतके झळकावली होती, तर कोहलीने याच दौऱ्यात ३०वे शतक साजरे केले होते; पण भारताच्या अन्य फलंदाजांना मात्र या दौऱ्यात सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाकडे स्मिथसहित डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल हे तडफदार फलंदाज आहेत. या तिघांकडेही एकहाती सामना फिरवण्याची कुवत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील काही महिन्यांपूर्वी झालेल्या कसोटी सामन्यांकडे पाहिले तर कोहली या वेळी सपशेल अपयशी ठरला होता, दुसरीकडे स्मिथने धावांची टांकसाळ उघडली होती. त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा सामना हे दोघे कसे करतात, यावर संघाचे मनोबल अवलंबून असेल.

भारताकडे जसप्रीत बुमराहसारखा युवा वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार हे त्रिकूट आहे. त्याचबरोबर भारताच्या फिरकीपटूंच्या कामगिरीवरही साऱ्यांच्या नजरा असतील. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या ऑस्ट्रेलियाच्या दोन गोलंदाजांनी भल्या भल्या फलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले आहे. त्याचबरोबर अ‍ॅश्टॉन अगरसारखा फलंदाजांना अडचणीत आणणारा फिरकीपटूही ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात आहे. जेम्स फॉल्कनरसारखा अनुभवी अष्टपैलू ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

कोहली आणि स्मिथ यांच्यातील दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कोणता संघ मालिका जिंकू शकतो, हे भाकीत करणे सोपे नसेल. भारताला घरच्या मैदानांचा फायदा मिळेल, असे म्हटले जात आहे; पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपली छाप पाडल्याने त्यांच्यासाठी मैदाने आणि वातावरण नक्कीच नवीन नसेल. एकंदरीत या मालिकेत धावांचा पाऊस आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला नक्कीच मिळेल.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, महेंद्रसिंग धोनी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, हिल्टन कार्टराईट, ट्रॅव्हीस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनीस, मॅथ्यू वेड, जेम्स फॉल्कनर, नॅथन कोल्टर-नील, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अ‍ॅश्टॉन अगर, अ‍ॅडम झम्पा, पीटर हॅण्डकोम्ब, अ‍ॅरोन फिंच

सामन्याची वेळ

दुपारी १.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण

स्टार स्पोर्ट्सवर वाहिनी.

आकडेवारीतली कामगिरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया.. क्रिकेट विश्वतील दोन दिग्गज संघ. रविवारपासून या संघांमध्ये ‘रन’धुमाळीला सुरुवात होणार आहे. ही मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधली असली तरी साऱ्यांचे लक्ष असेल ते विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ या आक्रमक कर्णधारांवर. पण आतापर्यंतची दोन्ही संघांची कामगिरी पाहिली तर भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचे पारडे किंचिंतसे जड नक्कीच आहे. आतापर्यंत एकिदवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा आणि बळींची यादी पाहिली तर सध्याच्या दोन्ही संघांतील एकही खेळाडू त्यामध्ये दिसत नाही. अपवाद फक्त रोहित शर्माचा. कारण भारताच्या या संघातील रोहितने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा आतापर्यंत खरपूस समाचार घेतला आहे. पण बरेचसे विक्रम भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियाकडून माजी कर्णधार स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग यांचीही भारताविरुद्धची कामगिरी लक्षणीय राहीलेली आहे. भारतातील या या दोन्ही संघांच्या कामगिरीचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाचे पारडे पुन्हा एकदा सरस दिसत आहेत. पण भारताने या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चार सामने जिंकले तर त्यांना ऑस्ट्रेलियाच्या भारतातील विजयाशी बरोबरी करता येईल. आणि जर भारताने या मालिकेत निर्भेळ यश मिळवले, तर आपल्या घरच्या मैदानांतील सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व पाहायला मिळू शकते. आकडेवारी सामन्याच्या सर्व गोष्टी विषद करते, यावर एकमत होणे शक्य नाहीच. पण ही आकडेवारी खोटी नसते, हे तर साऱ्यांना मान्य करायलाच लागेल. पण आतापर्यंतच्या या आकडेवारीचे दोन्ही संघांनी दडपण घेऊ नये. कारण आता काळ, संघ, कर्णधार, खेळाडू, वातावरण, व्यावसायिकता या साऱ्यांमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार दोन्ही संघ सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांतील मालिकेमध्ये कोणते विक्रम नव्याने रचले जातात आणि आकडेवारी किती बदलते याकडेल साऱ्यांचे लक्ष असेल.

भारताची ऑस्ट्रेलियाविद्धची आतापर्यंतची कामगिरी

सामने  विजय  पराभव   रद्द

१२३      ४१       ७२         १०

मायदेशातील  ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी

सामने  विजय  पराभव  रद्द

५१      २१        २५          ०५

ऑस्ट्रेलियातील कामगिरी

सामने  विजय  पराभव  रद्द

४८          ११    ३५         ०२

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील   कामगिरी

सामने  विजय  पराभव  रद्द

४१           ४       २२        ०५

त्रयस्थ ठिकाणावरील कामगिरी

सामने  विजय  पराभव  रद्द

२४       ०९        १२       ०३

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचे निकाल

साल     ठिकाण   सामने    विजयी संघ    भारत     ऑस्ट्रेलिया      रद्द

१९८४      भारत     ०५       ऑस्ट्रेलिया          ००           ०३              ०२

१९८६      भारत    ०६          भारत                 ०३           ०२              ०१

२००१      भारत    ०५      ऑस्ट्रेलिया             ०२           ०३             ००

२००७       भारत  ०७       ऑस्ट्रेलिया             ०२            ०४             ०१

२००९       भारत  ०७       ऑस्ट्रेलिया              ०२           ०४            ०१

२०१०       भारत  ०३        भारत                      ०१            ००          ०२

२०१३       भारत  ०७        भारत                       ०३          ०२            ०१

२०१६      ऑस्ट्रे. ०५    ऑस्ट्रेलिया                   ०१          ०४            ००

 

सर्वाधिक सामने

खेळाडू                       सामने       धावा     बळी     झेल

सचिन तेंडुलकर              ७१        ३०७७       २०      ३१

रिकी पॉन्टिंग                ५९        २१६४       —        १८

स्टीव्ह वॉ                       ५३       १११७       ४३       १६

मो. अझरुद्दिन               ४३        ९९०        ०६       १८

कपिल देव                      ४१      ६५५          ४५       १६

युवराज सिंग                  ४१       ९८१         १०      ११

अ‍ॅलन बोर्डर                    ३८      ११०४       ०८       १७

अँड्रय़ू सायमंड्स              ३६    १०६७         १        १५

मायकेल बेव्हन               ३५    १०८१        ०३       ०६

सौरव गांगुली                  ३५    ७७४           ०७      १२

हरभजन सिंग                 ३५    २९६           ३२    ०८

 

सर्वोत्तम फलंदाज

खेळाडू                     सामने         धावा         सर्वोच्च    सरासरी    १००    ५०

सचिन तेंडुलकर         ७१            ३०७७            १७५       ४४.५९        ०९      १५

रिकी पॉन्टिंग            ५९            २१६४            १४०*     ४०.०७         ०६    ०९

मॅथ्यू हेडन                 २८           १४५०           १२६        ५३.७०         ०३    १०

रोहित शर्मा                २३           १२९७           २०९        ६८.२६         ०५    ०३

महेंद्रसिंग धोनी          ४३           १२५५           १३९*      ४१.८३         ०२    ०६

सर्वोत्तम गोलंदाज

खेळाडू                      सामने            बळी            सर्वोत्तम           सरसरी

ब्रेट ली                          ३२                   ५५                ५-२७             २१.००

कपिल देव                    ४१                    ४५               ५-४३             २७.६८

मिचेल जॉन्सन             २७                    ४३               ५-२६             २६.०६

स्टीव्ह वॉ                      ५३                    ४३                ४-४०             २९.४६

अजित अगरकर             २१                  ३६                  ६-४२             २८.४१

 

सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या

* रोहित शर्मा (२०९ धावा, १५८ चेंडू) बेंगळुरु, २०१३

* सचिन तेंडुलकर (१७५ धावा, १४१ चेंडू) हैदराबाद, २००९

* रोहित शर्मा (१७१* धावा, १६३ चेंडू) पर्थ, २०१६

* जॉर्ज बेली (१५६ धावा, ११४ चेंडू) नागपूर, २०१३

* स्टीव्हन स्मिथ (१४९ धावा, १३५ चेंडू) पर्थ, २०१६

* सचिन तेंडुलकर (१४३ धावा, १३१ चेंडू) शारजा, १९९८

* रोहित शर्मा (१४१* धावा, १२३ चेंडू) जयपूर, २०१३

* सचिन तेंडुलकर (१४१ धावा, १२८ चेंडू) ढाका, १९९८

* रिकी पॉन्टिंग (१४०* धावा, १२१ चेंडू) जोहान्सबर्ग, २००३

* महेंद्रसिंग धोनी (१३९*धावा, १२१ चेंडू) मोहाली, २०१३

 

नीचांक धावसंख्या

* ६३ (२५.५ षटके)

भारत, सिडनी १९८१

* १०० (३६.३ षटके)

भारत, सिडनी २०००

* १०१ (४१.४ षटके)

ऑस्ट्रेलिया, पर्थ १९९१

* १२५ (४१.४ षटके)

भारत, सेंच्युरियन २००३

* १२९ (३८.२ षटके)

ऑस्ट्रेलिया, चेल्म्सफोर्ड १९८३

 

सर्वोच्च धावसंख्या

* ३८३-६ (५० षटके)

भारत, बेंगळुरू २०१३

* ३६२-१ (४३.३)

भारत, जयपूर २०१३

* ३५९-२ (५० षटके)

ऑस्ट्रेलिया, जोहान्सबर्ग २००३

* ३५९-५ (५० षटके)

ऑस्ट्रेलिया, जयपूर २०१३

* ३५४-७ (५० षटके)

भारत, नागपूर २००९

एका सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या

* ७२१-६ (९३.३ षटके) जयपूर, २०१३

एका सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या

* १२७-११ (४६.५ षटके)  सिडनी, १९८१