यंदाच्या ऑलिम्पिकवारीचा मीच हकदार आहे, कारण विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावून मी हा ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. त्यामुळे यावर माझाच अधिकार आहे, असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू नरसिंग यादवने एका खास मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

सध्या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून कुस्ती या क्रीडा प्रकारात ७४ वजनी गटामध्ये कोणता खेळाडू जाणार, याबाबत वाद-विवाद सुरु आहेत. नरसिंगने हा कोटा मिळवला असल्यामुळे त्यानेच ऑलिम्पिकला जायला हवे, असा एक मतप्रवाह आहे. दुसरीकडे भारताला कुस्तीमध्ये दोनदा ऑलिम्पिक पदके जिंकवून देणारा सुशील कुमारही याच वजनी गटात आला आहे. या दोघांपैकी एकालाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये एक चाचणी सामना घेऊन विजेत्याला ऑलिम्पिकला पाठवावे, असेही मत काही जणांनी व्यक्त केले आहे.

याबाबत नरसिंग म्हणाला की, ‘ मी हा कोटा मिळवला आहे, त्यामुळे जर मला ऑलिम्पिकला पाठवले नाही, तर तो माझ्यावर अन्याय असेल. भारतीय कुस्ती महासंघावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. या संघनेमध्ये अनुभवी व्यक्ती आहेत. त्यामुळे तो जे निर्णय घेतील तो मला नक्कीच मान्य असेल.’

विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पदक पटकावून ऑलिम्पिकचा कोटा मिळवणारा नरसिंग हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय कुस्तीपटूला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवून ऑलिम्पिकचा कोटा मिळवता आलेला नाही.

या वेळी सुशीलबाबत नरसिंग म्हणाला की, ‘ सुशील हा फार मोठा कुस्तीपटू आहे. त्याच्या ऑलिम्पिक पदकामुळे देशातील वातावरण कुस्तीसाठी अधिक पोषक झाले आहेत. तो साऱ्यांसाठी आदर्शवत असाच आहे. त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या आहेत. पण तरीदेखील मी हेच सांगेन की ऑलिम्पिकला जाण्याची ही माझी संधी आहे, कारण ती मी मिळवली आहे. जेव्हा सुशील यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये खेळला, तेव्हा त्यानेदेखील देशासाठीच कोटा मिळवला होता. पण त्यावेळी त्याच्याबाबतीत असा चाचणी सामना खेळवला गेला नाही. त्याने कोटा मिळवल्यावर त्यालाच ऑलिम्पिकला पाठवले गेले. आतापर्यंत ज्याने कोटा जिंकला आहे, त्यालाच ऑलिम्पिकला पाठवले गेले आहे. या नियमानुसार मीच ऑलिम्पिकला जायला हवे.’

नरसिंग हा सध्याच्या घडीला भारतातील सर्वोत्तम कुस्तीपटू आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मी त्याला ओळखतो, त्याच्या खेळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय बदल झालेला आहे. त्याने गेल्या वर्षभरात अव्वल विदेशी कुस्तीपटूंनाही पराभूत केले आहे. नरसिंगचा फॉर्म चांगला आहे. त्याचा सरावही उत्तम सुरु आहे. माझ्या मते जर तो ऑलिम्पिकला गेला तर त्याच्याकडून सुवर्णपदकाची आशा आपण करू शकतो.

– जी.एस.संघा,  साई कुस्ती प्रशिक्षक

सुशीलची न्यायालयात जाण्याची धमकी 

ऑलिम्पिक संघ निवडण्याकरिता चाचणी घेण्यात आली नाही तर न्यायालयात त्याविरुद्ध याचिका दाखल करण्याची माझी तयारी आहे, अशी धमकी ऑलिम्पिकपदक विजेत्या कुस्तीपटू सुशीलकुमारने दिली.ऑलिम्पिकमधील ७४ किलो गटासाठी नरसिंग यादवने जागतिक स्पर्धेतील कांस्यपदकाद्वारे देशासाठी प्रवेशिका मिळविली आहे. सुशीलने २००८च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक तर २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविले आहे. त्यानंतर त्याने ७४ किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ७४ किलो गटात सुशील व नरसिंग यांच्यापैकी कोणाला ऑलिम्पिकमध्ये संधी द्यायची असा पेच भारतीय कुस्ती महासंघापुढे निर्माण झाला आहे. सुशीलने २०१४ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. हा अपवाद वगळता त्याने गेल्या चार वर्षांमध्ये दुखापतीमुळे अनेक स्पर्धामधून माघार घेतली आहे. त्याच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.