फिफा विश्वचषक पात्रता फेरी

युवा गोलरक्षक मोइरांगथेम धीरज सिंग याला या महिन्याअखेरीस अफगाणिस्तान आणि ओमानविरुद्ध होणाऱ्या २०२२ फिफा विश्वचषक पात्रता फेरीसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी बुधवारी भारतीय संघाची घोषणा केली.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना १४ नोव्हेंबर रोजी ताजिकिस्तान येथील दुशान्बे या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर भारत आणि ओमान यांच्यातील परतीचा सामना १९ नोव्हेंबर रोजी मस्कत येथे होईल.

२०१७मध्ये झालेल्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत धीरजने अप्रतिम कामगिरी करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.

‘‘धीरज हा भारताचे भवितव्य आहे. युवा खेळाडूंवर आमचा विश्वास असून मैदानावर आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ते सदैव धडपडत असतात. पहिल्या पसंतीचे गोलरक्षक गुरप्रीत आणि अमरिंदर हेसुद्धा संघात असले तरी धीरजचा खेळ जवळून अनुभवता येईल,’’ असे स्टिमॅक यांनी सांगितले.

भारतीय संघ :

गोलरक्षक- गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, मोइरांगथेम धीरज सिंग. बचावफळी- प्रीतम कोटल, निशू कुमार, राहुल भेके, अनास इदाथोडिका, नरेंद्र, आदिल खान, सार्थक गोलुइ, सुभाशिष बोस, मंदार राव देसाई. मधली फळी- उदांता सिंग, जॅकीचंद सिंग, सेईमिनलेन डोंगेल, रायनियर फर्नाडेस, विनित राय, साहार अब्दुल समाद, प्रोणाय हल्देर, अनिरुद्ध थापा, लिलियनझुआला छांगटे, ब्रँडन फर्नाडेस, आशिक कुरुनियान. आघाडीची फळी- सुनील छेत्री, फारुख चौधरी, मनवीर सिंग.

भारताची व्हिएतनामशी बरोबरी

हानोई : भारतीय महिला फुटबॉल संघ आणि व्हिएतनाम यांच्यातील दुसरा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना १-१ असा बरोबरीत सुटला. थाय थी थाओने ३९ व्या मिनिटाला व्हिएतनामला आघाडीवर आणल्यानंतर रंजना चानूने ५७ व्या मिनिटाला गोल करून भारताला बरोबरी साधून दिली.