उपांत्य फेरीत पराभूत; पुरुष दुहेरीत कृष्णा-विष्णूची अंतिम फेरीत धडक

भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालला शनिवारी ओर्लीअन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र पुरुष दुहेरीत कृष्णा प्रसाद गरगा आणि विष्णू वर्धन या भारतीय जोडीने अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला.

टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या स्पर्धेतून अधिकाधिक गुण मिळवणे सायनासाठी गरजेचे होते. मात्र महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील लढतीत डेन्मार्कच्या लिन ख्रिस्तोफरसेनने अवघ्या २८ मिनिटांत सायनाला २१-१७, २१-१७ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. पहिल्या गेममध्ये सायना एकवेळ ११-१० अशी आघाडीवर होती, परंतु त्यानंतर ख्रिस्तोफरसेनने खेळ उंचावत सायनाला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. त्यामुळे २०१९नंतर प्रथमच एखाद्या स्पर्धेतील अंतिम फेरीत खेळण्याचे सायनाचे स्वप्न भंगले.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनाही पराभव पत्करावा लागला. जोंगकोलफॅन किथाराकूल आणि रविंदा प्राजोनगोज या थायलंडच्या अग्रमानांकित जोडीने अश्विनी-रेड्डी यांना २१-१८, २१-९ असे नमवले.

पुरुष दुहेरीत कृष्णा-विष्णू यांच्या जोडीने इंग्लंडच्या कॅलम हॅमिंग आणि स्टीव्हन स्टॉलवूड यांना अवघ्या ३५ मिनिटांत २१-१७, २१-१७ असे नेस्तनाबूत केले. या विजयासह त्यांनी प्रथमच सुपर १०० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे इंडोनेशियाच्या सबर गुटामा आणि रिझा पेहलावी किंवा इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन व्हँडी यांपैकी एका जोडीचे आव्हान असेल.

पहिल्या गेममध्ये दोन्ही जोड्या १३-१३ अशा बरोबरीवर होत्या. परंतु २१ वर्षीय कृष्णा आणि २० वर्षीय विष्णू यांच्या जोडीने क्रॉसकोर्टच्या फटकांच्या सुरेख वापर करताना सलग तीन गुण मिळवले आणि नंतर गेमही जिंकला. दुसऱ्या गेममध्येही दोन्ही स्पर्धकांमध्ये कडवी झुंज पाहण्यास मिळाली. मध्यंतराला भारतीय जोडीने ११-८ अशी आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडच्या जोडीने १७-१५ अशी पिछाडी भरून काढली. परंतु दडपणाखाली कृष्णा-विष्णूने उत्तम कामगिरी केली.

माझ्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा अद्यापही कायम आहेत. या स्पर्धेत मी अधिक झुंजार खेळ केला. परंतु उपांत्य फेरीच ख्रिस्तोफरसेनने माझ्या कमकुवत बाजूंचा लाभ उचलला.     – सायना नेहवाल</strong>