अबुधाबी कसोटीत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघावर ३७३ धावांनी मात करत पाकिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यासह मालिकाही आपल्या खिशात टाकली आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. नाणेफेक जिंकून सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानने १० गड्यांच्या मोबदल्यात २८२ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या फखार झमान आणि मधल्या फळीत कर्णधार सरफराज अहमदने ९४ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फिरकीपटू नॅथन लॉयनने ४ तर मार्नस लाबसचेंजने ३ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पुरता कोलमडला. मोहम्मद अब्बास आणि बिलाल आसिफ यांच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. पहिल्या डावात सलामीवीर अॅरोन फिंचने ३९ तर मिचेल स्टार्कने ३४ धावा केल्या. मात्र उस्मान ख्वाजासह इतर सर्व फलंदाज आपली छाप पाडू शकले नाहीत. यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा पुरता समाचार घेतला. ९ गड्यांच्या मोबदल्यात ४०० धावांवर डाव घोषित करुन पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५३८ धावांचं मोठं आव्हान दिलं.

यानंतर दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाच्या डावाची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. अॅरोन फिंच, ट्रॅविस हेड, मार्नस लाबसचेंज आणि मिचेल स्टार्क या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर सर्व फलंदाज केवळ हजेरीवीर ठरले. पहिल्या डावाप्रमाणे मोहम्मद अब्बासने ५ बळी घेतले, त्याला दुसऱ्या डावात यासिर शहाने ३ बळी घेत चांगली साथ दिली. मोहम्मद अब्बासला सामनावीर आणि मालिकावीर या किताबाने गौरवण्यात आलं.