आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर आलेली नामुष्की टाळण्यात पाक क्रिकेट बोर्डाला यश आलेलं आहे. पाकिस्तानी संघाच्या प्रमुख स्पॉन्सरशीपसाठी पाक क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वी निवीदा काढल्या होत्या. परंतू पाक संघाला आधीपासून स्पॉन्सरशीप देणारी पेप्सी कंपनीचा अपवाद वगळता एकही कंपनीने स्पॉन्सरशीपसाठी रस दाखवला नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघावर स्पॉन्सरशीप शिवाय खेळण्याची वेळ आली होती. शाहिद आफ्रिदी फाउंडेशनने पाक क्रिकेट बोर्डाला आर्थिक सहाय्य करत आपला लोगो वापरण्याची परवानगी दिली.

पेप्सी कंपनीचा अपवाद वगळता एकही कंपनी पाक क्रिकेट बोर्डाला स्पॉन्सरशीप देण्यासाठी पुढे आली नव्हती. पेप्सीनेही गेल्या कराराच्या तुलनेत ३५ ते ४० कमी रक्कम आपल्या निवीदेत दिली होती. त्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाने अखेरीस पुन्हा एकदा पेप्सी कंपनीसोबतचा करार वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जून २०२१ पर्यंत पेप्सी कंपनी पाकिस्तानी संघाची प्रमुख स्पॉन्सर असणार आहे. मात्र यासाठी पेप्सीने किमान ४० टक्के कमी रक्कम मोजली आहे. करोना लॉकडाउन काळात अनेक कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे, ज्याचा परिणाम क्रिकेट बोर्डाच्या कारभारावर होताना पहायला मिळतोय.

१९९० पासून पेप्सी आणि आमचे संबंध आहेत. या काळात पाक संघांने काही चांगले दिवस अनुभवले आहेत. पुढील वर्षभरासाठी पेप्सी कंपनी आमच्यासोबत कायम आहे. पाकिस्तानी संघातील खेळाडूंमुळे कंपनीला होणारा फायदा व आमचे वर्षांपासूनचे चांगले संबंध यामुळे हे शक्य झाल्याचं पाक क्रिकेट बोर्डाचे Commercial Director बाबर हमिद यांनी सांगितलं. याव्यतिरीक्त पाकिस्तान संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी EasyPaisa ही कंपनी पाक क्रिकेट संघाची असोसिएट स्पॉन्सर म्हणून काम पाहणार आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये ३ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.