झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी आणि 4 चेंडू राखून पराभव केला. पण, या सामन्यात पाकिस्तानसाठी आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या साहिबजादा फरहान याच्या नावे एका अत्यंत लाजिरावाण्या विक्रमाची नोंद झाली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 8 गडीबाद 183 धावा केल्या. कांगारु संघाकडून डार्सी शॉर्ट याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर कर्णधार अॅरॉन फिंच याने 47 धावा केल्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला पाकिस्तानचा संघ ठोस सलामी देण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. सलामीवीर फखर जमान आणि आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी साहिबजादा फरहान खेळपट्टीवर आले.

पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणं कोणत्याही खेळाडूसाठी सर्वाधिक आनंदाचा आणि गर्वाचा क्षण असतो, आणि हा क्षण कायम लक्षात राहावा यासाठी तो खेळाडू पूर्ण प्रयत्न करतो. साहिबजादानेही असाच विचार केला असेल पण नशीबासमोर तो काहीही करु शकला नाही. डावातील दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिलाच चेंडू खेळताना साहिबजादा बाद झाला. पहिल्याच चेंडूवर बाद होणं दुःखद असतंच पण फलंदाज जर स्वैर चेंडूवर बाद झाला तर त्याचं दुःख केवळ तो फलंदाजच समजू शकतो. एकही चेंडू न खेळता साहिबजादा बाद झाला. त्याला ऑस्ट्रेलियाचा पार्ट टाइम गोलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने बाद केलं. त्याने मॅक्सवेलला पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चलाख मॅक्सवेलने तो चेंडू स्वैर टाकला आणि साहिबजादा यष्टिचीत झाला. त्यामुळे पदार्पणाच्याच सामन्यात एकही चेंडू न खेळता बाद होणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला.

पण फखर जमान याच्या धडाकेबाद 91 धावांच्या खेळीच्या बळावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि तिरंगी मालिका आपल्या नावे केली. फखर जमान आणि शोएब मलिक यांनी चौथ्या गड्यासाठी 107 धावांची महत्तवपूर्ण भागीदारी रचली आणि संघाचा विजय निश्चीत केला. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ठरला. तसंच टी-20 तील सलग नवव्या मालिका विजयाची पाकिस्तानने नोंद केली.