पाकिस्तानी संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी संघाची घोषणा केली. जुलै महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानी संघ इंग्लंडमध्ये ३ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. अझर अलीकडे पाकिस्तानच्या कसोटी संघाचं कर्णधारपद देण्यात आलेलं असून बाबर आझम टी-२० मालिकेत पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. या दौऱ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.

इम्रान खान आणि पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांच्यात सोमवारी एक बैठक झाली. या बैठकीत या दौऱ्याबाबतची सगळी माहिती घेतल्यानंतर इम्रान खान यांनी क्रिकेट मालिकेला हिरवा कंदील दाखवला. “पंतप्रधान इम्रान खान यांनी मणी यांना सांगितलं की पाकिस्तानने इंग्लंड दौऱ्यावर कसोटी आणि टी-२० क्रिकेट मालिकेसाठी जाणं महत्त्वाचं आहे, कारण आता साऱ्यांनाच पुन्हा क्रिकेटचा थरार पाहायचा आहे. तसंच करोनाचा प्रादुर्भाव असला तरीही अनेक इतर क्रीडा प्रकार सुरू झाले आहेत”, असे पाक क्रिकेट बोर्डाने सांगितले.

इम्रान खान

पाक क्रिकेट बोर्डाने सरफराज अहमद आणि १९ वर्षाखालील क्रिकेटमधला स्टार खेळाडू हैदर अली यांना संघात संधी दिली आहे. तसेच तब्बल ४ वर्षांनंतर ३६ वर्षीय सोहेल खानने पाकिस्तानी संघात पुनरागमन केलं आहे. काही दिवसांपूर्वी पाक क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी माजी पाक खेळाडू युनूस खान याची फलंदाजी प्रशिक्षक तर मुश्ताक अहमद याची फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी नेमणूक केली आहे.

“इंग्लंडमधील वातावरणात खेळताना सर्वोत्तम निकाल देतील अशा खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून खेळाडूंनी एकही सामना खेळलेला नसल्यामुळे संघनिवड हे आव्हानात्मक काम होतं. मात्र आगामी काळात सरावाला सुरुवात झाल्यानंतर हे सर्व खेळाडू इंग्लंडचा सामना करण्यासाठी तयार होतील”, असे मत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आणि निवड समिती प्रमुख मिसबाह उल-हक यांनी संघ जाहीर करताना मांडलं होतं.