झिम्बाब्वेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात आज पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान याने स्फोटक फलंदाजी करत कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकले. अशी कामगिरी करणारा हा पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला. त्याने नाबाद २१० धावा केल्या. १५६ चेंडूच्या या खेळीत त्याने २४ चौकार आणि ५ षटकार खेचले.

या खेळीसह त्याने भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याचे ३ पैकी २ विक्रम मोडीत काढले. रोहितने आतापर्यंत तीन वेळा द्विशतक झळकावले असून त्यापैकी दोन वेळा २०८ व २०९ धावा केल्या होत्या. हे दोन विक्रम झमानने मोडले. मात्र सार्वधिक २६४ धावांचा रोहितचा विक्रम अबाधित राहिला. याशिवाय, २१९ धावांचा वीरेंद्र सेहवागचा विक्रमही बचावला.

याशिवाय, पाकिस्तानच्या संघाने आज एकदिवसीय इतिहासातील सर्वोकृष्ट सलामी भागीदारीचा नवा उच्चांक गाठला. एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे सलामीवीर इमाम उल हक आणि फखर झमान यांनी पहिल्या विकेटसाठी ३०४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमध्ये इमाम उल हक याने ११३ धावांचे योगदान दिले तर झमानने १६९ धावा केल्या. ४२ षटकांत पाकिस्तानच्या सलामीवीरांनी ३०४ धावा केल्या. इमाम उल हकने आपल्या खेळीत १२२ चेंडूत ११३ धावा करत ८ चौकार ठोकले. या दोघांनी श्रीलंकेच्या उपूल थरंगा आणि सनथ जयसूर्या यांचा २८६ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला.

याव्यतिरिक्त आज उभारलेली १ बाद ३९९ ही धावसंख्या पाकिस्तानची एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोकृष्ट धावसंख्या ठरली. झमानच्या नाबाद २१० आणि इमामाच्या ११३ धावांबरोबरच असिफ अली यानेही धडाकेबाज कामगिरी केली. त्याने २२ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार खेचत नाबाद अर्धशतक (५०) केले.

दरम्यान, ४०० धावांच्या बलाढ्य आव्हानाचा झिम्बाब्वेचा संघ कसा पाठलाग करतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.