पाकिस्तानच्या ढेपाळलेल्या क्रिकेटविश्वात स्वत:चे स्थान प्रस्थापित करणाऱ्या युनूस खानने अलीकडेच निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या क्रिकेटवर आणि त्याच्या वादग्रस्त कारकीर्दीवर एक नजर..

पाकिस्तानातील अशांत वातावरणाचा तेथील क्रिकेटवरसुद्धा परिणाम होत असल्याचे गेली अनेक वष्रे दिसून येत आहे. २००९ मध्ये श्रीलंकेच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील क्रिकेट चळवळीचा वेग मंदावला आहे. पण पाकिस्तान सुपर लीगसारख्या स्पध्रेमुळे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रयत्नांमुळे तेथे क्रिकेट पुन्हा नांदू शकेल, अशी आशा निर्माण होत आहे. अशा कठीण कालखंडातून जाणाऱ्या पाकिस्तानला काही आशेची किरणे सुखावत आहेत, ती मैदानावरील कामगिरीमुळे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या झुंजार वृत्तीचे यथोचित दर्शन घडवणाऱ्या या अवलियाचे नाव आहे युनूस खान. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा युनूसने ओलांडला, हा पराक्रम करणारा तो पहिलावहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला, हा त्याचा खरा बहुमान.

गेली १७ वष्रे पाकिस्तानी क्रिकेटची इमानेइतबारे सेवा करणारा युनूस आता ३९ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णयसुद्धा त्याने जाहीर करून टाकला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध चालू असलेली मालिका युनूस आणि कसोटी कर्णधार मिसबाह उल हक यांच्या कारकीर्दीतील अखेरची मालिका आहे. त्यामुळेच पाकिस्तानी क्रिकेटमधील हा एका युगाचा शेवट आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तरी पाकिस्तानचे क्रिकेट काय गमावणार आहे, याची प्रचीती येते. गेल्या काही वर्षांत जे काही प्रेरणादायी क्षण पाकिस्तानी क्रिकेटने अनुभवले त्यात युनूस आणि मिसबाहचा सिंहाचा वाटा आहे. ज्या वर्षी पाकिस्तानी क्रिकेटचा जागतिक क्रिकेटशी संपर्क तुटला, त्याच वर्षी म्हणजे २००९ मध्ये पाकिस्तानने ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. त्यावेळी पाकिस्तानचे नेतृत्व युनूसकडेच होते. याच स्पध्रेसह त्याने ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेटला अलविदा केला. युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून मी समाधानाने निवृत्ती घेत आहे, असे सांगणारा युनूस काही वर्षांतच परतला.

निवृत्तीकडे वाटचाल करणाऱ्या युनूसने धावांचे आणि विक्रमांचे अनेक इमले बांधले, जे देशासाठी खास होते. कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा, शतके युनूसच्या नावावर आहेत. याचप्रमाणे कसोटी खेळणाऱ्या सर्वच्या सर्व ११ राष्ट्रांमध्ये शतके झळकावणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो तिसरा पाकिस्तानी फलंदाज आहे. फेब्रुवारी २००० मध्ये कराची येथे श्रीलंकेविरुद्ध युनूसने एकदिवसीय पदार्पण करीत आपल्या क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ केला. तेव्हापासून आतापर्यंत दीडशेहून अधिक एकदिवसीय सामने तो खेळला. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून समाधानाने निवृत्ती स्वीकारली. मात्र कसोटी क्रिकेटमधील त्याचा प्रवास अविरत सुरू होता. आता शंभरहून अधिक कसोटी सामने त्याच्या खात्यावर जमा आहेत.

शोकांतिका

युनूसची कारकीर्द प्रदीर्घ म्हणजे १७ वर्षांची. या कालखंडात नातलगांच्या मृत्यूच्या अनेक शोकांतिका त्याच्या आयुष्यात घडल्या, विशेष म्हणजे २००५ आणि २००६ मध्ये. २००५ च्या पूर्वार्धात युनूस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना वडिलांच्या निधनामुळे त्याला दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले होते. वर्षभराने पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असताना एका दुर्घटनेमुळे त्याच्यावर जणू आभाळच कोसळले. मोहम्मद शरीफ खान हा युनूसचा मोठा भाऊ. युनूसला क्रिकेटचे धडे मोहम्मदनेच गिरवायला शिकवले. युक्रेनमध्ये झालेल्या कार अपघातात वयाच्या ४१व्या वर्षी मोहम्मदचे निधन झाले. त्यानंतर डिसेंबर २००६मध्ये युनूसचा आणखी एक मोठा भाऊ फरमान अली खानचा (३९) जर्मनीत झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी पाकिस्तानचा संघ फैसलाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळत होता. युनूस आपला डाव खेळायला गेला, तेव्हा ही बातमी संघव्यवस्थापनाला कळली. तो पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर याची त्याला कल्पना देण्यात आली. मग तातडीने युनूसने मरदान येथील आपल्या निवासस्थानाकडे प्रस्थान केले. याशिवाय उर्वरित सामन्यांतसुद्धा तो खेळू शकला नाही.

२००७ मध्ये कॅरेबियन बेटांवर झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आणि बॉब वूल्मर यांचा गूढ मृत्यू झाला. बॉब यांना मी वडिलांप्रमाणे मानायचो, त्यामुळे ते गेले तेव्हा मला वडील गेल्याचेच दु:ख झाले. माझ्या क्रिकेट आणि खासगी जीवनातील अनेक गोष्टींसंदर्भात मी त्यांच्याशी गप्पा मारायचो आणि मार्गदर्शन घ्यायचो, असे युनूसने म्हटले आहे. २०११ मध्ये युनूसचा भाऊ शमशाद खानचा मृत्यू झाला, त्यावेळी पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. मात्र युनूसला मायदेशी परतण्याची विशेष परवानगी देण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये युनूसच्या पुतण्याचा मृत्यू झाला.

कारकीर्दीतील वाद

पाकिस्तानी क्रिकेट आणि क्रिकेटपटू म्हणजे वाद, हे परवलीचेच. अगदी युनूससुद्धा या वादांपासून दूर राहू शकला नाही. १३ ऑक्टोबर २००९ या दिवशी युनूसने नेतृत्वाचा त्याग केला. सामना निश्चितीच्या आरोपामुळे त्याची संसदीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. नंतर या चौकशीत तो निर्दोष ठरला. मात्र सामना निश्चितीच्या वैयक्तिक आणि सांघिक आरोपांमुळे मला आता कर्णधारपदाचा कंटाळा आल्याचे स्पष्ट करीत त्याने कर्णधारपद पुन्हा स्वीकारले नाही. २००९च्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात ग्रँट एलियटचा झेल सोडल्यामुळे युनूस पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला. मात्र सामन्याआधी त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे सिद्ध झाले.

युनूसच्या नेतृत्वाखाली संघाचे अपयश अधोरेखित झाल्याने १० मार्च २०१० या  दिवशी युनूसवर बंदी घालण्यात आली. जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पराभवाला जबाबदार धरत पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून युनूसवर बेमुदत बंदी घालण्यात आली. सुदैवाने तीन महिन्यांतच त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली. युनूसने कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे निष्पन्न झाल्यावरही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी युनूसला पाकिस्तानच्या संघात स्थान देण्यात आले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांनी अनेकदा हाराकिरी पत्करल्याचे चित्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिसले. त्यामुळे युनूसला सन्मानाने संघात स्थान देण्याचे दडपण पाकिस्तान क्रिकेट मंडळावर येऊ लागले. नेमक्या याच काळात पाकिस्तानचा फलंदाज आणि कसोटी कर्णधार सलमान बटला स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. त्यावेळी झहीर अब्बास, मोईन खान यांच्यासारख्या माजी कर्णधारांनीसुद्धा युनूसवर विश्वास व्यक्त केला. युनूसकडे पाकिस्तानचे नेतृत्व सुपूर्द करा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र पीसीबीला हे मुळीच रुचले नाही. २०१० च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी युनूसचे पुनरागमन अपेक्षित होते. याचप्रमाणे कर्णधारपदासाठी तो सर्वोत्तम पर्याय त्यांच्याकडे होता. मात्र पीसीबीच्या धोरणानुसार मोहसिन खान यांच्या निवड समितीने मिसबाह उल हकला पुन्हा संघात पाचारण केले आणि त्याच्याकडे नेतृत्व बहाल केले.

३१ ऑगस्ट २०१० च्या डेली टेलिग्राफ वृत्तपत्र युनूसचे सामना निश्चिती करणाऱ्या मझहर मजीदशी संबंध असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्या वृत्ताने युनूसच्या आयुष्यात आणि पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये खळबळ माजली. मात्र युनूसने आत्मविश्वासाने या कठीण प्रसंगाचा सामना केला. खोटे आरोप करणाऱ्या डेली टेलिग्राफला त्याने न्यायालयात खेचले. त्यानंतर या वृत्तपत्राला जाहीर दिलगिरी प्रकट करण्याची पाळी आली होती. त्यामुळे अब्रुनुकसानीचा दावा त्याने मागे घेतला. मग २०१० च्या वर्षअखेरीत युनूस आणि पीसीबीचे संबंध सुधारण्याची चिन्हे दिसू लागली. मोहम्मद युसूफला दुखापत झाल्याने युनूसच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ५४ धावा काढून युनूसने यशस्वी पुनरागमनसुद्धा केले. याशिवाय आणखी एका सामन्यात ७४ धावांची खेळी साकारून त्याने संघाला एक विकेट राखून विजय मिळवून दिला. मग वर्षभरानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळाले. यावेळी शानदार शतक आणि मिसबाहसोबत १६८ धावांच्या खेळीसह त्याने पुनरागमन झोकात साजरे केले.

निवृत्तीनंतर मार्गदर्शनाकडे

आयपीएलच्या पहिल्या हंगामात युनूसला राजस्थान रॉयल्सने उत्तम भाव देत संघात स्थान दिले होते. मात्र जेमतेम एक सामना तो खेळू शकला. त्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध दुरावल्यामुळे आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आले नाही. परंतु पाकिस्तानमध्येही आता लीगचे वारे वाहू लागले आहेत. पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झाल्मी संघाचा मार्गदर्शक म्हणून युनूसने यंदा काम पाहिले. निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून आपण कारकीर्द सुरू करणार असल्याचेच जणू त्याने स्पष्ट केले आहे.
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा