पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराज सिंहला आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा पंजाब संघासाठी खेळण्याची विनंती केली आहे. पंजाब संघासाठी खेळाडू कम मार्गदर्शक म्हणून युवराजने खेळावं अशी क्रिकेट संघटनेची इच्छा आहे. परंतू युवराजने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांनी युवराजला विनंती केल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

“पाच-सहा दिवसांपूर्वी आम्ही युवराजला हा प्रस्ताव दिला होता आणि आम्ही त्याच्या उत्तराची वाट पाहत आहोत. त्याने निवृत्ती मागे घेऊन पुन्हा खेळायला सुरुवात केली तर पंजाब संघासाठी ती खरंच चांगली गोष्ट असेल. तो खेळाडूंना मार्गदर्शनही करु शकतो.” पुनीत बाली यांनी आपली प्रतिक्रीया दिली. सध्या युवराज शुबमन गिल, अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, हरप्रीत ब्रार यासारख्या तरुण पंजाबच्या खेळाडूंना मार्गदर्शन करतो आहे.

गेल्या काही वर्षांत महत्वाच्या खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यामुळे पंजाबला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत युवराज पुन्हा संघात आला तर त्याचा फायदा संघाला होईल असं मत बाली यांनी व्यक्त केलं. परंतू निवृत्ती मागे घेऊन पुन्हा पुनरागमन करणं युवराजसाठी सोपं नसणार आहे. बाहेरील देशातील टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी युवराजने आपल्या आंतरराष्ट्री कारकिर्दीला रामराम केला. आतापर्यंत युवराज कॅनडामधील ग्लोबल टी-२० आणि अबु धाबी येखील T 10 लिग मध्ये सहभागी झाला आहे. युवराजने भारताकडून ४० कसोटी, ३०४ वन-डे आणि ५८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.