२०१५ च्या विश्वचषकात बुकींकडून आपल्याला दोन लाख अमेरिकन डॉलरची ऑफर देण्यात आली होती अशा प्रकारचं वक्तव्य करुन पाकिस्तानी फलंदाज उमर अकमलने गेल्या काही दिवसांमध्ये खळबळ उडवून दिली होती. पाकिस्तानमधील सामा वृत्तवाहिनीच्या Sports Action या कार्यक्रमात बोलत असताना उमर अकमलने हा दावा केला होता. त्याचं हेच वक्तव्य आता त्याच्या अंगलट येणार असल्याचं दिसतंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उमर अकमलला मॅच फिक्सींगच्या वक्तव्यावरुन नोटीस पाठवल्याचं समजतं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने उमर अकमलला २७ जूनरोजी आपल्यासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. बुकींकडून मोठ्या रकमेची ऑफर येऊनही आपण ती स्पष्ट शब्दात नाकारल्याचं अकमलने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मी क्रिकेटशी कधीही गद्दारी करणार नाही असं म्हटत अकमलने आपली बाजू स्पष्ट केली होती. २००९ सालात पाकिस्तानकडून पदार्पण केल्यानंतर उमर अकमल अशाच प्रकारच्या वक्तव्यांसाठी प्रसिद्धीत राहिलेला आहे.

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उमर अकमलने पाकिस्तानी संघाच्या लायसन्स मॅनेजरने रात्री ३ वाजता आपल्या हॉटेलच्या खोलीवर येऊन, आपल्याला मोठ्या रकमेची ऑफर दिली होती. याचसोबत सामन्यात आपण जसं सांगू तसं खेळल्यास सोन्या-चांदीच्या भेटवस्तूंसह अनेक गोष्टी देण्याचंही त्या मॅनेजरने मान्य केल्याचं उमरचं म्हणणं होतं. मात्र या गोष्टीचा आपल्याला राग असल्यामुळे आपण त्याला ताबडतोक खोलीतून हाकलवून लावल्याचं उमर म्हणाला. मात्र या गोष्टीची तक्रार उमर अकमलने पाक क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसीकडे केली नव्हती. त्यामुळे उमर अकलमच्या दाव्यांवर अनेकांनी शंकाही निर्माण केली होती. त्यामुळे आता भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या चौकशीत उमर या प्रकरणाबाबतचे काय तपशील देतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.