खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या अ‍ॅलिस्टर कुकने चिवटपणे खेळ करत शानदार पुनरागमन केले. या पुनरागमनासह त्याने संघासमोर आदर्श वस्तुपाठ ठेवला. कुक जोपासत असलेल्या मूल्यांमुळेच त्याच्या नेतृत्वाला बळकटी मिळाल्याचे मत इंग्लंडचे प्रशिक्षक पीटर मूर्स यांनी व्यक्त केले.  
‘आपल्यावर होणाऱ्या टीकेतून तो सकारात्मक गोष्टी शोधतो. कामगिरी सुधारण्यासाठी त्याचा सतत प्रयत्न असतो. स्वत:ची कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हते तेव्हा त्याने मान्य केले. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आणि योग्य वेळी संयमी खेळी करत सहकाऱ्यांसमोर उदाहरण ठेवले, हे त्याचे वेगळेपण आहे’, असे मूर्स यांनी पुढे सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘चतुर कर्णधार म्हणून तो विकसित होत आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत, वरिष्ठ खेळाडूंचा आदर राखत त्याने संघाचा समतोल साधला आहे. कुक विजयाने हुरळून जात नाही आणि पराभवाने विचलित होत नाही. शंभर टक्के प्रयत्न देण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो’.