बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्माच्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या मैदानात बांगलादेशने बाजी मारत मालिकेत १-० ने बाजी मारली. या मालिकेतला दुसरा सामना गुरुवारी राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र अरबी समुद्रातील ‘महा’ चक्रीवादळामुळे या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दुसऱ्या सामन्याआधी रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी रोहितचं एक वेगळचं रुप समोर आलं.

रोहित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना, एका पत्रकाराचा फोन वाजला. यावेळी रोहितने काही क्षणांसाठी थांबत आणि बॉस, प्लीज तुमचा फोन सायलेंटवर ठेवा असं म्हणत पुन्हा आपलं बोलणं सुरु ठेवलं.

बुधवारी रात्री राजकोट परिसरात मुसधळार पाऊस झाला. मात्र हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी आणि इतर भाग सुरक्षित केला होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या कामगिरीवरुन दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.