नेमबाजीत जागतिक स्तरावर यश मिळवणे हे आव्हानच मानले जाते. या खेळात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जाते. अशा अवघड खेळात केवळ राष्ट्रीय नव्हे तर जागतिक स्तरावर स्वत:चे आणि भारताचे नाव उज्ज्वल करण्यात नेमबाज पूजा घाटकरने यश मिळवले आहे. ‘केसरी’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या उपक्रमांतर्गत तिच्याशी संवाद साधण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

महाराष्ट्रातील नेमबाज कन्यांनी गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर यश मिळवत आपला दबदबा निर्माण केला आहे. जेमतेम आठ वर्षांच्या कारकीर्दीत राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर पदकांची कमाई करणाऱ्या पूजा घाटकरचे नावही या मराठमोळ्या नेमबाज कन्यांच्या मांदियाळीत सामील झाले आहे. नेमबाजीच्या क्षेत्रातील तिचा प्रवेश ते राष्ट्रकुल नेमबाजीतील सुवर्णपदक, जागतिक अजिंक्य स्पर्धेतील कांस्यपदकापर्यंतचा तिचा प्रवास कसा झाला, हे पूजाकडून ऐकण्याची संधी येत्या १८ डिसेंबरला होणाऱ्या ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात मिळणार आहे. पूजाबरोबरच्या या गप्पांचा कार्यक्रम पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता रंगणार आहे.

पूजाने जेमतेम आठ वर्षांच्या कारकीर्दीत स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पदकांची कमाई केली आहे. तिची नेमबाजीची कारकीर्द महाविद्यालयीन जीवनात एनसीसीद्वारे सुरू झाली. एनसीसीमध्ये असताना तिने २००८ मध्ये केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. तिने वैयक्तिक विजेतेपदही मिळवले. याच वर्षी अभिनव बिंद्राने ऑलिम्पिक नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. कोणत्याही वैयक्तिक खेळात भारताला मिळालेले हे पहिलेच सोनेरी यश होते. त्याच्या या कामगिरीने आपल्या देशात खऱ्या अर्थाने नेमबाजीयुग निर्माण झाले. अनेक नवोदित खेळाडूंनी या खेळात कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली.

पूजाच्या आईने कबड्डीत चांगले यश मिळवले असले तरी पूजाचा कल वैयक्तिक खेळाकडेच होता. त्यामुळेच तिने नेमबाजीत कारकीर्द घडवण्याचे ठरवले. अर्थात हे सोपे नव्हते. कितीही कष्ट पडले तरी याच खेळात जागतिक स्तरावर यश मिळवण्याच्या निर्धाराने तिने सराव केला. १० मीटर एअर रायफल या क्रीडा प्रकारात तिने आजपर्यंत विविध स्तरांवर ८०हून अधिक पदके जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये तिने अनेक मानांकित खेळाडूंवर मात करण्याची किमया केली आहे. भारतीय संघाला विविध स्पर्धामधील सांघिक विभागात विविध पदके जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पूजाचे सर्व लक्ष आता २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकडे लागले आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक  मिळवण्याचे ध्येय उराशी बाळगून असलेली पूजा सध्या त्यासाठी कसून मेहनत घेते आहे. राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारासह अनेक मान-सन्मान मिळवणाऱ्या पूजाशी पुणेकरांना ‘व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर दिलखुलास गप्पा मारता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका सभागृहावर अर्धा तास आधी उपलब्ध होणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने प्रवेश देण्यात येईल, तर काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.