रंगना हेराथने पाच बळी घेण्याची किमया साधल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर श्रीलंकेचे वर्चस्व सिद्ध झाले.
डावखुरा फिरकी गोलंदाज हेराथने ६५ धावांत ५ बळी घेत कसोटी क्रिकेटमध्ये पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम ११व्यांदा साधला. त्यामुळेच श्रीलंकेने न्यूझीलंडचा पहिला डाव २२१ धावांत संपुष्टात आणला. त्यानंतर दिवसअखेर न्यूझीलंडने १ बाद ९ अशी मजल मारली. नाइट वॉचमन सूरज रणदिव आणि सलामीवीर थरंगा परणवितना अनुक्रमे ३ आणि ० धावांवर खेळत आहेत. पदार्पणवीर सलामीवीर दिमुथ करूणारत्नेला वेगवान गोलंदाज टिम साऊदीने भोपळा फोडण्याच्या आतच पायचीत केले.
कारकीर्दीमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज शमिंदा इरंगाने ५१ धावांत ३ बळी घेतले. न्यूझीलंडतर्फे सलामीवीर ब्रेंडन मॅक्क्युलम (६८) आणि मधल्या फळीतील फलंदाज डॅनियल फ्लिन (५३) यांनी चांगली फलंदाजी केली.